विद्यार्थ्यांशी संवाद : आधारवड परिवाराचा उपक्रमवर्धा : गणित विषयात पारंगत होण्यासाठी सतर्क व चौकस बुद्धीची गरज असते. त्यामुळे संज्ञा, संकल्पना व प्रमेयाचे सहज आकलन करता येते. हा दृष्टिकोन स्वीकारला तर विद्यार्थी गणिताच्या शिक्षकाला घाबरत नाही, उलट शिक्षकच विद्यार्थ्यांना घाबरतात. यामुळे विद्यार्थ्यांनो अधिक चौकस बना, असे आवाहन नेहरू विद्यालय सालोड (हि.) चे माजी मुख्याध्यापक पुरूषोत्तम पोफळी यांनी केले. मॉडेल हायस्कूल नेरी पुर्नवसन येथे आधारवड ज्येष्ठ नागरिक मित्र परिवारातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा विद्यार्थ्यांशी संवाद हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपक्रम संयोजक प्राचार्य शेख हाशम, न्यू इंग्लिश कनिष्ठ महा.चे निवृत्त प्राचार्य श्रीधर महाजन, निवृत्त शिखक पांडुरंग भालशंकर, प्राचार्य मनोज बडगाईया, मुख्याध्यापक नांदूरकर व शिक्षक उपस्थित होते. आधारवड या ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनेतर्फे विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी हातभार लागावा आणि त्यांच्या ठिकाणी उत्तम नागरिकांच्या गुणाचा विकास व्हावा या उद्देशाने ‘विद्यार्थ्यांशी संवाद’ हा उपक्रम ग्रामीण भागातील शाळांतून राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत आधारवडच्या सेवानिवृत्त तज्ञ शिक्षकांची चमु शाळेत जाते. विद्यार्थ्यांना परिसर व जीवनोपयोगी विषयाशी संबंधित सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारून त्यांना बोलके करण्याचा प्रयत्न करते. उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तके भेट दिली जातात. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी हा त्यामागचा उद्देश असतो. सोबत शाळेच्या ग्रंथालयाला १० पुस्तके भेट दिली जातात. विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व कळावे म्हणून काही प्रयोग केले जातात. शिवाय वृक्ष संवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांनी समजून घ्यावे, यासाठी आधारवडतर्फे विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण केले जाते. त्यांची जबाबदारीही विद्यार्थ्यांकडे सोपविली जाते. हे सर्व उपक्रम या कर्यक्रमात राबविण्यात आले. विद्यार्थ्यांना ३२ पुस्तके भेट देण्यात आली. मुख्या. नांदुरकर यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन प्राचार्य शेख हाशम यांनी केले तर आभार शिक्षक डोळे यांनी मानले.(कार्यालय प्रतिनिधी)
गणितासाठी सतर्क व चौकस बुद्धीची गरज
By admin | Updated: October 6, 2016 00:38 IST