गांधी १५० अभियान : ५ आॅक्टोबर रोजी समित्यांचे विधिवत गठण सेवाग्राम : नई तालीम समिती परिसरातील शांती भवन येथे ‘गांधी १५०’ जयंती अभियानांतर्गत दोन दिवसीय राष्ट्रीय संमेलन घेण्यात आले. विविध राज्यातील २६९ प्रतिनिधींचा सहभाग असलेल्या या संमेलनात पाच ठराव घेण्यात आले. या ठरावांसह ५ आॅक्टोबर रोजी विविध समित्या गठित करण्याचा निर्णय घेत संमेलनाची सांगता करण्यात आली. सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर यांनी ठरावाचे वाचन केले. यात आपण सर्वांना गांधीजींना लोकापर्यंत पोहोचवायचे असून न्यायपूर्ण अहिंसक व मानवीय समाजाप्रती निर्भय गांधींना लोकांसमोर मांडावे. गांधीजींच्या विचारांची भूमी असून विचार नित्यनूतन असल्याने सदैव मार्गदर्शन देणारा आहे. या मिशनमध्ये राहणारा आमच्या सोबत सहयोगी राहील. आम्हाला सत्ता निरपेक्ष राहून, लोकाधारीत राहून काम करायचे आहे. आम्हाला माहिती आहे की, आव्हाने खूप आहे, सत्ता, सफलता व संपत्तीकांक्षी समाजात शेवटच्या व्यक्तीशी प्रतिबद्ध राहून कार्यसिद्धीस तयार राहावे आदींचा समावेश होता. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर तर अतिथी म्हणून सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही व गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू राजेंद्र खेमानी उपस्थित होते. याप्रसंगी खेमानी यांनी राष्ट्रीय कार्यक्रमाला रचनात्मक कार्याची जोड मिळाली पाहिजे, असे सांगितले. महादेव विद्रोही यांनी दोन दिवस गांधी १५० वर संमेलन झाले. यात पुनर्रचित समिती बनवावी व ती त्वरित तयार करून विचार आणि कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात यावे, असे सांगितले. मठकर यांनी समितीच्या सूचना देऊन राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाची रूपरेषा ठरवून लवकरच कार्यान्वित करण्यात येईल, असे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन अनिल फरसोले यांनी केले तर आभार डॉ. सुगन बरंठ यांनी मानले. प्रशांत गुजर यांनी गीत सादर केले. आश्रमात सकाळी घंटीघर ते बापूकुटीपर्यंत रामधून, सर्वधर्म प्रार्थना झाली. सायंकाळी प्रार्थना भूमीवर सूतकताई व प्रार्थना झाली. यावेळी जयवंत मठकर, डॉ. श्रीराम जाधव, भावेष चव्हाण, बाबा खैरकर, अशोक गिरी, हिराभाई, जालंदरनाथ, डॉ. शिवचरण ठाकुर आदी उपस्थित होते.(वार्ताहर) राष्ट्रीय समितीची घोषणा गांधी १५० च्या राष्ट्रीय समितीची घोषणा करण्यात आली. उपस्थित सर्व सहयोगी असल्याचे मान्य करीत संघटन व संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले. समविचारांना जोडा. सहभागींनी किमान पाच लोकांना तयार करावे. ५ जूनपर्यंत राष्ट्रीय समिती घोषित होईल व ५ आॅक्टोबरला राष्ट्रीय संमेलन घेण्यात येईल. राज्य स्तरावर संमेलन व्हावे, कार्यालय सेवाग्राम आश्रमात आहे. रवींद्र रुख्मीणी पंढरीनाथ, प्रदीप के., रमेश ओझा समितीचे काम पाहणार आहे.
पाच ठरावांनी राष्ट्रीय संमेलनाचा समारोप
By admin | Updated: February 23, 2017 00:48 IST