आमला शिवारातील घटना : दोन्ही पक्षांवर गुन्हे वर्धा : आमला शिवारातील भास्कर इथापे यांच्या शेतात सुरू असलेले नाम फाऊंडेशनचे काम अवैध आहे, असा आरोप करीत तिघांनी काम करणाऱ्या कार्यकर्त्याला शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार सावंगी पोलिसात दिली. तर याच प्रकरणात नामच्या कार्यकर्त्यांनीही कामाबाबत विचारणा करण्याकरिता आलेल्या तिघांना शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार केली. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही पक्षांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोठा परिसरातील आमला शिवारात भास्कर इथापे यांच्या मालकीचे शेत आहे. या शेतात नाम फाऊंडेशनच्यावतीने काही काम सुरू होते. या कामावर अरुण गजानन निमकरडे (२८) रा. पळशी जि. बुलडाणा हा कार्यरत होता. दरम्यान राजू गोरडे, जितेंद्र गोरडे व अभय महल्ले हे तिथे आले. या तिघांनी निमकरडे याला सदर काम अवैध आहे, असे म्हणत शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार त्याने पोलिसात केली. या तक्रारीवरून तिघांवर भादंविच्या २९४, ५०६ व ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला.तर राजू गोरडे, जितेंद्र गोरडे व अभय महल्ले यांनी सावंगी (मेघे) पोलिसात जात निमकरडे याला कामाबाबत विचारणा केली असता त्याने या तिघांना शिवीगाळ केल्याची तक्रार पोलिसात केली. त्यांच्या तक्रारीवरून निमकरडे याच्या विरोधात भादंविच्या २९४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलीस तपास करीत असून कुणालाही अटक करण्यात आली नव्हती.(प्रतिनिधी)
नाम फाऊंडेशनच्या कार्यकर्त्याला जीवे मारण्याची धमकी
By admin | Updated: May 29, 2016 02:17 IST