वर्धा : येथील हिंगणघाट मार्गावर असलेल्या जामठा शिवारातील नाल्याजवळ इसमाचा मृतदेह आढळून आला. मृतदेहावर असलेल्या जखमा व घटनास्थळी सापडलेल्या रक्ताने माखलेल्या दगडावरून त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना शनिवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. मृतकाची ओळख अद्याप पटली नाही. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जामठा येथील राजू ढोबळे यांच्या शेताजवळ असलेल्या नाल्याजवळ गावातील एका इसमाला मृतदेह पडून असल्याचे दिसून आले. याची माहिती त्याने गावच्या पोलीस पाटलाला दिली. त्यांनी ही माहिती सेवाग्राम पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत पाहणी केली असता मृतदेहाच्या अंगावर जखमा असल्याचे दिसून आले. शिवाय मृतदेहाच्या शेजारी रक्ताने माखलेले काही दगड दिसून आले. यामुळे त्याची हत्या करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतकाचे वय अंदाजे ५० ते ५२ वर्षे असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्याची घटनास्थळी आणून हत्या करण्यात आली वा हत्या करून त्याला आणून टाकण्यात आले, या बाबत स्पष्ट सांगता येत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. शिवाय त्याची दगडाने ठेचून हत्या केली वा गळा आवळून हे ही सांगणे कठीण आहे. जोपर्यंत मृतदेहाचे शवविच्छेदन होणार नाही तोपर्यंत काहीच सांगणे कठीण असल्याचे घटनास्थळी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. घटनास्थळी गेलेले कर्मचारी परत आल्यानंतर रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सेवाग्राम पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)
जामठा शिवारात इसमाची हत्या
By admin | Updated: March 22, 2015 01:53 IST