रामदास तडस यांची माहिती : वर्धा, हिंगणघाट व धामणगावला थांबावर्धा : रेल्वेने लोकसभा मतदार संघातील प्रवाश्यांना नव्या गाडी रुपात दिवाळी व नववर्षाची भेट दिली आहे. मुंंबई-काजीपेठ ही नवीन रेल्वे एक्स्पे्रस लवकरच सुरू होणार आहे. १ डिसेंबरपासून ही गाडी प्रवाश्यांच्या सेवेत रूजू होणार आहे. २१ डब्ब्यांची ही गाडी वर्धेसह हिंगणघाट व धामणगावला थांबा देणार असल्याची माहिती खा. रामदास तडस यांनी दिली. बल्लारपूरहून थेट मुंबईकरिता रेल्वेगाडी सुरू करण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यातील प्रवाशी करीत होते. मध्य रेल्वेच्या रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीचे सदस्य या नात्याने खा. तडस यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक एस. के. सुद यांच्यापर्यंत पोहचविली. त्याची फलश्रूती म्हणून नवीन रेल्वे गाडी सुरू झाल्याबाबतचे परिपत्रक व वेळापत्रक नुकतेच प्रसिद्ध झाल्याचे पत्र रेल्वे मंत्रालयाकडून खा. तडस यांना प्राप्त झाले आहे. ही साप्ताहिक एक्सप्रेस गाडी मुंबईहून काजीपेठ येथे जाण्याकरिता दर मंगळवारी मध्यरात्री १२.०५ वाजता वर्धा रेल्वे स्थानकावर येणार आहे. बुधवारी ही गाडी काजीपेठे येथून मुंबईकरिता रवाना होणार असून तिची वर्धा रेल्वे स्थानकावरील वेळ १२.१५ वाजता असणार आहे. हिंगणघाट व धामणगाव येथे या गाडीचा थांबा असणार आहे.(प्रतिनिधी)काजीपेठ ते मुंबई ही रेल्वेगाडी १ डिसेंबरपासून सुरु करणार असल्याचे पत्र रेल्वे मंत्रालय व रेल्वे महाव्यवस्थापनाकडून प्राप्त झाले आहे.- खा. रामदास तडस, वर्धा.
मुंबई-काजीपेठ ही नवी एक्स्प्रेस डिसेंबरपासून प्रवाश्यांच्या सेवेत
By admin | Updated: November 11, 2015 01:26 IST