धुमणखेडा गाव ठरले अपवाद : दुपारपर्यंतच ५० टक्के मतदानवर्धा : कित्येक वर्षांपासूनच्या गावातील समस्या सोडविल्या जात नसल्याने चार गावांतील संतप्त ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. यातील दोन गावांमध्ये कुणीही मतदान केले नाही. एका गावात पाच मतदारांनी हक्क बजावला तर एका गावातील बहिष्काराचा प्रयत्न विफल ठरला.मोई गावात एकही मत नाहीआष्टी तालुक्यातील मोई ग्रा.पं. अंतर्गत मोई, मुबारकपूर, कोल्हाकाळी या तीन गावांमिळून १८०० लोकसंख्या असून १२२५ मतदार आहे. या तीनही गावातील मतदानासाठी मोईमध्ये दोन केंद्र सज्ज करण्यात आले होते; पण ग्रामस्थांनी गावात पाणी नाही म्हणत मतदानावर बहिष्कार टाकला. दुपारी ठाणेदार दिलीप ठाकूर, तहसीलदार सीमा गजभिये यांनी मोई गावात जाऊन ग्रामस्थांना मतदान करण्याची विनंती केली; पण मतदारांनी चक्क नकार दिला. यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांना मोई येथील मते पारड्यात पाडून घेता आली नाही. याचा परिणाम निकालावर होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. वाघदराच्या ग्रामस्थांचाही बहिष्कारवर्धा तालुक्यातील आंजी जि.प. गट आणि मांडवा पं.स. गणात येणाऱ्या वाघदरा या गावातील नागरिकांनीही मतदानावर बहिष्कार टाकला. या गावात १३५ मतदार असून एकाही मतदाराने मतदान केले नाही. या गावात कुठल्याही मुलभूत सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. रस्ते नाही, नाल्यांचा अभाव आणि शिवाय पाण्यासाठीही भटकंती करावी लागते. याबाबत अनेकदा निवेदने देऊनही उपयोग होत नसल्याने ग्रामस्थांत असंतोष पसरला आहे. यामुळे गुरूवारी कुणीही मतदान केले नाही. रस्ते व मुलभूत सुविधांसाठी बहिष्कार समुद्रपूर तालुक्यातील विखणी हे गाव २० वर्षांपासून रस्ते, नाल्या व मुलभूत सुविधांपासून वंचित आहे. यास्तव विखणी येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकला. या गावात सायंकाळपर्यंत केवळ पाच लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. विखणी येथून मुख्य बाजारपेठ सिंदी (रेल्वे) येथे जाण्याकरिता विखणी-जसापूर-दिग्रज असा रस्ता आहे; पण या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. विधानसभा निवडणुकीत गावाकडे लक्ष दिले जाईल, या आशेने ग्रामस्थांनी मतदान केले; पण दुर्लक्ष कायम राहिले. रुग्णालयात जाण्यासाठीही एकमेव रस्ता असल्याने प्रशासन व लोकप्रतिनिधींकडे साकडे घातले; पण उपयोग झाला नाही. यामुळे जि.प., पं.स. निवडणुकीवर बहिष्कार टाकला. गुरूवारी येथे केवळ चार पुरूष व एका महिलेने मतदान केले. येथील मतदार संख्या ४५७ अशी आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)
मोई, वागदराचा मतदानावर १०० टक्के बहिष्कार; विखणीत पाच जणांचे मतदान
By admin | Updated: February 17, 2017 02:09 IST