तहसीलदारांवर गंभीर आरोप : मोईच्या सरपंचाची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारआष्टी (शहीद) : तलाठी पदभरतीमध्ये गैरप्रकार करण्यात आला आहे. स्वस्त धान्य दुकानदारांवर मेहरबानी दाखवित वसुली केली जात असल्याचा आरोप मोई येथील सरपंच सुधाकर पवार यांनी केला आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. या प्रकरणात काय कार्यवाही होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.निवेदनानुसार, मौजा मुबारकपूर व आबाद (किन्ही) येथील नागरिकांसाठी पुरवठा विभागाने एन.डी. पवार यांना परवाना दिला. त्यांनी योग्यरित्या धान्य पुरवठा केला नाही. एकाच ग्राहकाचे दोन कार्ड तयार करून बेकायदेशीर धान्य उचल केली, असा आरोप पवार यांनी केला आहे. याप्रकरणी तहसीलदारांकडे लेखी तक्रार करूनही कार्यवाही झाली नाही. प्रथमदर्शनी गुन्हा सिद्ध होऊनही पोलिसांत गुन्हा दाखल केला नाही. नवीन कार्ड काढण्याकरिता तहसीलदार गजभिये यांच्याकडे रितसर अर्ज सादर केल्यानंतरही नागरिकांना दोन महिने कार्ड दिले जात नाही. परिणामी, नागरिक धान्यापासून वंचित आहे. तालुक्यात ६० स्वस्त धान्य दुकानदार व ७४ केरोसीन विक्रेते आहे. हे गरजूंना शासकीय मापाप्रमाणे वाटप करीत नाही. याप्रकरणी अनेक तक्रारी केल्या. त्याची दखल घेतली नाही. सरपंच पवार यांनी शासकीय धान्य दुकानदारांकडे चौकशी केली असता सर्व विक्रेत्यांकडून महिन्याकाठी अंदाजे दुकानदार ५०० रुपये व केरोसीन विक्रेते ३०० रुपये, असे ५० हजार रुपये दरमहा उकळतात, असे गंभीर आरोप पवार यांनी केले आहे. आष्टी तहसील कार्यालयांतर्गत रिक्त असलेल्या मौजातील कोतवालाच्या जागा मे महिन्यात भरल्या. यासाठी सुशिक्षीत उमेदवारांनी अर्ज केले होते; पण मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या परिचयातील उमेदवारांना नियम डावलून नियुक्ती दिली. यात प्रत्येकाकडून ५० हजार ते १ लाख २५ हजार रुपये घेण्यात आले. या नियुक्त्या तहसीलदारांनी केल्याचा आरोपही पवार यांनी केला. कोतवाल भरती मंडळ अधिकारी, पटवारी व राजकीय व्यक्तींच्या वरदहस्ताखाली पैसे घेऊन झाली. शिक्षित, मेहनती व गरजुंना डावलण्यात आले. कोतवाल भरतीची चौकशी करून कार्यवाही करावी, अशी मागणीही त्यांनी केली. याप्रकरणी मुख्यमंत्री, महसूल मंत्री, अन्न नागरी पुरवठा मंत्री, मुख्य सचिव, महसूल आयुक्त यांना लेखी निवेदनाद्वारे रजिस्टर्ड तक्रार करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)शेतकऱ्यांच्या नोंदी घेण्यासाठी होते पैशाची मागणीशेतकऱ्यांच्या शेतात नोंदणी, फेरफार व पीक नोंदीकरिता अर्ज देऊनही मंडळ अधिकारी व पटवारी ४-५ महिने नोंदी रेकॉर्डला घेऊन मंजूर करीत नाही. यामुळे शेतकऱ्यांना शासकीय योजनेचा लाभ घेता येत नाही. एका नोंदीसाठी शेतकऱ्याला २ ते ५ हजार रुपयांची मागणी पटवारी व मंडळ अधिकारी करतात. यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे. सदर तक्रार हेतुपुरस्पर व द्वेष भावनेतून केली आहे. मी कुणाकडूनही पैसे घेतले नाही. कोतवाल भरती पारदर्शक झाली आहे. कुठल्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे. - सीमा गजभिये, तहसीलदार, आष्टी.तहसीलदार आष्टी यांच्याबाबत कोतवाल भरती व धान्य पुरवठा गैरप्रकार प्रकरणी तक्रार अद्याप माझ्याकडे प्राप्त झाली नाही. सदर प्रकरण जिल्हाधिकारी यांच्याकडे येते. निवेदन आल्यानंतर चौकशी करण्याचा निर्णय होईल. - दीपक नलावडे, अप्पर जिल्हाधिकारी, वर्धा.
तलाठी भरतीत गैरप्रकार, पुरवठा विभागात हप्तेवारी
By admin | Updated: June 3, 2016 02:08 IST