वर्धा : जिल्ह्यात असलेल्या मतीमंद व मुकबधीर शाळेतील शिक्षकांना गत तीन महिन्यापासून वेतन मिळाले नाही. त्यामुळे सुमारे दीडशे शिक्षकांना आर्थिक विवंचनेतचा सामना करावा लागत आहे. समाजकल्याण विभागांतर्गत येत असलेल्या या शाळांचे वेतन देयके काढणारे अधिकारी बाहेर गावाहून ये-जा करीत असल्याने त्यांच्याकडून या देयकांवर स्वाक्षरीच होत नसल्याचा आरोप या शिक्षकांनी केला आहे.जिल्ह्यात आजच्या घडीला अपंग, अंध, मतीमंद व मुकबधीर विद्यार्थ्यांकरिता १२ अनुदानित शाळा आहेत. या शाळांत येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकविण्याकरिता शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना शासनाच्या अनुदानानुसार वेतन दिले जाते. मात्र या वेतन देण्यात कुठलीही नियमितता नसल्याने या शिक्षकांना वारंवार वेतनाकरिता प्रतीक्षा करावी लागत आहे. या शिक्षकांसह कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्यापासून वेतन नाही. वर्षातून एक ते दोन वेळा या शिक्षकांना वेतनाच्या विलंबाचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)
मतिमंद शाळेचे शिक्षक वेतनापासून वंचित
By admin | Updated: February 1, 2015 23:02 IST