तीन महिन्यांपासून तुतीचे बेणे मिळाले नसल्याने खरीप हंगाम बुडालादेवळी : जिल्हा रेशीम कार्यालयाकडे तुतीच्या बेण्याबाबत प्रस्ताव देवून सुध्दा याबाबतची कारवाई झाली नाही. परिणामी तालुक्यातील काजळसरा व वाटखेडा येथील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. आज-उद्या करता करता गत तीन महिन्यांपासून बेणे न मिळाल्याने या शेतकऱ्यांच्या जमिनी पडिक राहिल्या आहेत. या दिरंगाईला जिल्हा रेशीम कार्यालयाचे अधिकारी जबाबदार असल्याने त्यांनी कास्तकारांच्या खरीप हंगामाच्या पिकाची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरीत आहे. तालुक्यातील मौजा काजळसरा व वाटखेडा येथील कास्तकारांनी जिल्हा रेशीम कार्यालयाचे सभासदत्व धारण करून तूती लागवडीचा प्रस्ताव सादर केला. कार्यालयाचे सभासद शुल्क सुध्दा भरण्यात आले; परंतु कास्तकारांना या वर्षीच्या खरीप हंगामात रेशीम कार्यालयाकडून तुतीचे बेणे प्राप्त झाले नाही. याबाबत वारंवार पाठपुरावा करून सुध्दा त्याची दखल घेतल्या गेली नाही. कार्यालयातील अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे देवून या कास्तकारांना धुडकावून लावले. तूती घेण्याच्या अपेक्षेने या खरीप हंगामात या शेतकऱ्यांनी कोणतेही पीक न घेतल्याने त्यांच्या जमिनी पडिक राहिल्या. यामध्ये त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतीच्या भरवश्यावरच कुटुंबियांचा उदरनिर्वाह व मुलांचे शिक्षण अवलबूंन असल्याने या नुकसानीचा त्यांना फटका बसला. अधिकाऱ्यांची मुजोरी व हेकेखोरी या बाबीला कारणीभूत असल्याने वरिष्ठांनी याची दखल घेण्याची मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषिंवर कार्यवाही करीत खरीप हंगामाची भरपाई द्यावी अशी मागणी दिनेश धामंदे, पळसराम भगत, मनोज राऊत, चिंधू हाते, मोहनराव हुसनापूरे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत केली आहे. (प्रतिनिधी)
जिल्हा रेशीम कार्यालयाच्या बेबंदशाहीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान
By admin | Updated: September 17, 2016 02:26 IST