वर्धा : शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळीपूर्वी करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता; पण यंदा अद्यापही शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात आलेले नाही़ यामुळे दिवाळी कशी साजरी करायची, असा प्रश्न उपस्थित झाला आहे़ शिक्षण विभागाने याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ऐन दिवाळीच्या तोंडावर वेतन देण्यात आले नाही़ यामुळे त्यांच्या दिवाळीवर विरजण पडणार असल्याचेच दिसून येत आहे़ दिवाळीचा सण दोन दिवसांवर असताना वेतन न मिळाल्याने शिक्षक व कर्मचाऱ्यांत असंतोष पसरला आहे़ वर्षभर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी राबणारा कर्मचारी, शासकीय परिपत्रकांची अंमलबजावणी करणारा कर्मचारी म्हणून शिक्षकांकडे पाहिले जाते़ आपली कर्तव्यतत्परता ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांवरच यंदा गदा आल्याचे दिसून येत आहे़ आॅक्टोबर २०१४ चे पे-बील पास झाले असताना आणि दिवाळी तोंडावर असताना वेतन मिळत नसल्याने कर्ज काढून दिवाळी साजरी करायची काय, असा प्रश्न शिक्षक, कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे़ ऐन दिवाळीच्या सणात शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे़ यापेक्षा कठिण स्थिती शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आहे़ आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर वेतनापासून वंचित राहण्याची वेळ यावी, यापेक्षा दुर्दैव कोणते, असा खेदही संतप्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व्यक्त करीत आहेत़ शिक्षण विभाग आणि संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देत त्वरित तोडगा काढावा आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन अदा करावे, अशी मागणी श्याम बेलखोडे यांच्यासह अन्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्यावतीने करण्यात आली आहे़(कार्यालय प्रतिनिधी)
दिवाळीपूर्वी वेतनास खो; शिक्षक, कर्मचाऱ्यांत असंतोष
By admin | Updated: October 20, 2014 23:17 IST