Lok Sabha Election 2019; अग्रवाल सर्वाधिक श्रीमंत उमेदवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 11:36 PM2019-03-26T23:36:07+5:302019-03-26T23:37:53+5:30
वर्धा लोकसभा मतदार संघातून बहुजन समाज पक्षाच्यावतीने निवडणूक रिंगणात असलेले शैलेशकुमार प्रेमकुमार अग्रवाल हे मतदार संघातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार आहेत. अग्रवाल यांच्याकडे चल-अचल अशी ११ कोटींच्यावर संपत्ती असल्याची माहिती त्यांनी निवडणूक शपथपत्रात दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा लोकसभा मतदार संघातून बहुजन समाज पक्षाच्यावतीने निवडणूक रिंगणात असलेले शैलेशकुमार प्रेमकुमार अग्रवाल हे मतदार संघातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार आहेत. अग्रवाल यांच्याकडे चल-अचल अशी ११ कोटींच्यावर संपत्ती असल्याची माहिती त्यांनी निवडणूक शपथपत्रात दिली आहे. तसेच अग्रवाल यांच्यावर आर्वी पोलीस ठाण्यात एका गुन्ह्याची नोंद आहे.
आर्वीच्या वलीसाहेब वॉर्डातील रहिवासी असलेले अग्रवाल यांच्याकडे ५ लाख रूपये रोख स्वरूपात असून त्यांच्या नावे एसबीआय वर्धा येथे ३८ लाख १३ हजार, एसबीआय आर्वी येथे ६५ लाख, कार्पोेरेशन बॅँक नागपूर येथे ३० लाख, पंजाब नॅशनल बॅँक सावंगी येथे २० लाख आणि एसबीआय नागपूर येथे ५५ लाख रूपयाचे एफबीआर काढण्यात आले आहे. त्यांच्या पत्नीजवळ २ लाख रूपये रोख असून त्यांच्या नावे सुद्धा पंजाब नॅशनल बॅँक सावंगी येथे ५ लाख, ३ लाख व ४ लाख ११ हजार रूपयाचे एफबीआर काढण्यात आले आहे. याशिवाय अग्रवाल यांनी एसबीआय लाईफमध्ये १० लाख व त्यांच्या पत्नीने सुद्धा १० लाखांची गुंतवणूक केली आहे. अग्रवाल यांची एलआयसीमध्ये १० लाख व त्यांच्या पत्नीची पीपीएफ मध्ये ८ लाख व एलआयसीमध्ये २९ लाख रूपयाची गुंतवणूक आहे. अग्रवाल यांच्याकडे १२७ ग्रॅम सोने असून त्याची किंमत ३ लाख ८१ हजार आहे.
याशिवाय त्यांच्या पत्नीकडे ५६० ग्रॅम सोने आहे. त्याची किंमत १६ लाख ८० हजार रूपये आहे. एकूण वाहने व ज्वेलरी असे मिळून अग्रवाल यांच्याजवळ ३ कोटी ५७ लाख ५८ हजार रूपयाची चल स्वरूपाची मालमत्ता आहे तर त्यांच्या पत्नीकडे ८४ लाख ९१ हजार रूपयाची संपत्ती आहे. याशिवाय त्यांच्याकडे इसाकपूर शिवारात शेती असून पत्नीच्याही नावे १.११ हेक्टर आर जमीन आहे. याशिवाय वर्धा, सालोड (नेरी), देवळी, भादोड येथे जमीन असल्याचे त्यांनी शपथपत्रात नमुद केले आहे. वर्धा शहरात आर्वी मार्गावर जमीन आहे. या सर्व संपत्तीचे बाजारमूल्य ३ करोड रूपये असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. याशिवाय अग्रवाल यांच्यावर ५ लाख ५३ हजार ३८० रूपयाचे कर्ज आहे तर त्यांच्या पत्नीवर १५ लाख ४५ हजारांचे कर्ज आहे. अग्रवाल हे निरमा विद्यापीठातून २००८ मध्ये एमबीए झालेले आहेत.
अग्रवाल यांच्याकडे महागड्या गाडीसह तीन वाहने
अग्रवाल यांच्याकडे आॅडी हे चारचाकी वाहन असून ४२ लाख ५० हजार रूपये दाखविण्यात आली आहे. याशिवाय ५ लाख १० हजार रूपये किंमतीची व १ रुग्णवाहिका असून तिची किंमत ३ लाख ४ हजार रूपये आहे.