सतीश काळे।लोकमत न्यूज नेटवर्कअल्लीपूर : महिलांचं जीवन हे ‘चूल आणि मूल’ इथपर्यंत मर्यादित होतं. पण, महिलांची शक्ती ओळखून समाजात तिलाही चार भिंतीबाहेर आपले अस्तित्व सिद्ध करण्याची संधी मिळाली. ग्रामीण भागातील महिलांना खऱ्या अर्थाने बचत गटाच्या माध्यमातून बळ मिळाले. परिणामी, आज गावागावातील महिला सक्षम होऊन स्वत: जोरावर आपला संसार ऐटीत हाकताना दिसून येत आहे. यात अल्लीपूरच्या महिलांचाही समावेश असून त्यांनी स्वयंरोजगारातून माध्यमातून आपल्या समृद्ध जीवनाची वाट धरली आले.येथील विद्या वाघमारे या महिलेचे जीवन बचत गटामुळे संमृद्ध झाले आहे. पती-पत्नी दोघेही दुसऱ्याच्या कामाला जाऊन परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. काही दिवसांपूर्वी विद्या वाघमारे यांनी प्रज्ञा शील स्वयंसहाय्यता बचत गट स्थापन केला. या मध्ये पंधरा महिला सदस्या असून दरमहा प्रत्येकी १०० रुपये गोळा करायला सुरुवात केली. सहा महिन्यापर्यंत हा बचत गट सुरळीत चालल्याने बचत गटाला स्वयंरोजगारासाठी बँकेकडून कर्ज मिळाले. यातून बचत गटाच्या महिलांनी आपापला स्वयंरोजगार सुरु करुन परिवाराला हातभार लावण्याचा प्रयत्न चालविला आहे. विद्या वाघमारे यांनी त्याच पैशातून दोन शेळ्या घेतल्या. वर्षभरातच उत्पन्न दुप्पट झाल्याने गटाच्या माध्यमातूनही शेळीपालन व्यवसायाला चालना मिळाली. पैशाची आवकही वाढू लागल्याने त्यांची ही भरभराटी पाहून उमेद अभियान अंतर्गत विद्या वाघमारे यांची पशुसखी म्हणून गावातून निवड करण्यात आली. पशुसखी म्हणून कार्य करीत असताना वेगवेगळे पशुखाद्य, औषधी व खते तयार करून ते पशुपालकांना माफक दरात उपलब्ध करुन देत आहे. या व्यवसायातून त्यांना महिन्याकाठी पंधरा ते वीस हजार रुपये मिळत असल्याने त्यांच्या कष्टमय जीवनाचे फलीत झाले आहे. त्यांनी बिकट परिस्थितीवर मात करून घेतलेली ही झेप इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.महिलांच्या वाट्याला नेहमीच संघर्ष असतो. तेव्हा खचून न जाता परिस्थितीशी झगडण्यासाठी आपण तयार असलो की, आपल्याला आपोआपच मार्ग सापडायला लागतात. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याची मोठी चळचळ उभी राहिली असून त्यातून महिलांनी आपले आयुष्य सुखकर करावे.- विद्या वाघमारे, अल्लीपूर.
शेळीपालनातून उजळल्या जीवनवाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 22:10 IST
सतीश काळे। लोकमत न्यूज नेटवर्क अल्लीपूर : महिलांचं जीवन हे ‘चूल आणि मूल’ इथपर्यंत मर्यादित होतं. पण, महिलांची शक्ती ...
शेळीपालनातून उजळल्या जीवनवाटा
ठळक मुद्देजिद्द, चिकाटीच यशाचे गमक : स्वयंसाहाय्यता बचत गटातून मिळाली उभारी