तिघांना अटक : रोख रकमेसह मोबाईल पळविलावर्धा : ट्रकमध्ये प्रवासाकरिता लिफ्ट मागत लुटमार केल्याची घटना नाचणगाव परिसरात शनिवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली. यात इसमाजवळून २२ हजार रुपये रोख व एक मोबाईल असा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता. या प्रकरणातील तपास पूर्ण करण्यात पोलिसांना यश आले असून त्यांनी तिघांना अटक केली. त्यांच्याजवळून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संजय आत्राम, देवानंद आत्राम व नाना उईके सर्व रा. पळासगाव अशी अटकेत असलेल्यांची नावे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करताच लुटमार करणाऱ्यांचा शोध पोलिसांनी घेतला असून त्यांना तत्काळ अटक करणे शक्य झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाचणगाव येथील नाना राऊत (४५) हा एम एच ०४ एम के ६६८५ हा ट्रक घेऊन भुसावळकडे जात होता. दरम्यान, नाचणगाव शिवारात संजय आत्राम, देवानंद आत्राम व नाना उईके या तिघांनी त्याला हात दाखवून थांबण्यास सांगितले. तिघेही ओळखीचेच असल्याने नाना याने ट्रक थांबवून तिघांना बसवून घेतले. ट्रकने चालक व हे तिघे आगरगाव येथे दारू पिण्याकरिता गेले. येथे या चौघांनीही यथेच्च मद्यपान केले. नशेत तिघांनी चालक नाना याला शिवीगाळ केली. शिवाय त्याच्या खिशातील २२ हजार रुपये रोख व मोबाईल असा एकूण २३ हजार रुपयांचा मुद्देमाल घेवून पळ काढला. या प्रकरणी ट्रक चालक राऊत याच्या तक्रारीवरून ३९२, ५०४, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला.(प्रतिनिधी)
लिफ्ट मागत ट्रक चालकाला लुटले
By admin | Updated: August 31, 2015 01:58 IST