वर्धा : शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची सक्ती शासनाने केली आहे. अध्यादेश काढून नियमावलीची अंमलबजावणी व्हावी म्हणून आदेश दिले असले तरी या आदेशाला कर्मचाऱ्यांकडून केराची टोपली दाखविण्याचा प्रकार अनेकदा घडतो. या सर्वांत नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. याचा प्रत्यय कवठा (रेल्वे) येथील नागरिकांना येत आहे. त्रस्त झालेल्या नागरिकांनी तलाठ्याची बदली करण्याची मागणी केली आहे. कवठा (रेल्वे) येथील तलाठी राऊत हे मुख्यालयी राहत नाही. अनेकदिवस कार्यालयात राहत नसल्याने कागदपत्रांसाठी अनेक दिवसांपर्यंत प्रतीक्षा करावी लागते. ग्रामस्थ कार्यालयात प्रमाणपत्रे घेण्यासाठी जातात, मात्र तलाठी राहत नसल्याने आल्यापावली परतावे लागते. शेतीचा सातबारा काढण्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार कार्यालयात येरझारा माराव्या लागतात. ग्रामस्थांनी यापूर्वी येथील तलाठ्यांबाबत तहसीलदारांकडे तक्रार केली होती. मात्र तलाठी कार्यालयात गैरहजरच असतात. ग्रामस्थांसोबत अरेरावी करून धमकावणी केली जाते. शेतकरी, विद्यार्थी यांना कार्यालयातून आल्यापावली परतावे लागत असल्याने कार्यवाहीची मागणी होत आहे. महत्वाच्या प्रमाणपत्रांसह विविध शासकीय योजनेच्या लाभापासून गावकरी वंचित आहेत. तलाठी गावात येत नसल्याने योजनेची माहिती ग्रामस्थांना होत नाही. दुष्काळ मदत निधी आल्यास तो देखील कधी वेळेवर मिळत नाही. या सततच्या प्रकाराने ग्रामपंचायत प्रशासनाने ठराव घेऊन तलाठ्याची बदली करावी अशी मागणी तहसीलदारांकडे केली आहे.(स्थानिक प्रतिनिधी)
तलाठ्याला मुख्यालयी राहण्याची अॅलर्जी\
By admin | Updated: January 18, 2015 23:16 IST