वर्धा : दारूबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासह जनसामान्यांच्या प्रश्नांना घेऊन अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या जिल्हा शाखेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी धरणे दिले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष प्रभा घंगारे यांच्या नेतृत्वात निवेदन पाठविण्यात आले. जिल्ह्यात १९७२ पासून दारूबंदी कायदा अमलात आला. मात्र हा कायदा आज कागदोपत्रीच उरला आहे. एकदाचे प्यायला पाणी मिळणार नाही; मात्र दारू कुठेही आणि केव्हाही सहज उपलब्ध होते. जिल्ह्यासह शहरातील बहुतांश भागात राजरोसपणे दारूचे व्यवसाय सुरू आहेत. जिल्ह्याच्या सीमालगत असलेल्या वाइन शॉप, बारमधून मोठ्या प्रमाणात चोरट्या मार्गाने दारूसाठा येतो, हे सर्वश्रुत आहे. दारूबंदीला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग आहे. मात्र हा विभागही बघ्याची भूमिका घेऊन आहे. पोलीस विभागामार्फत दररोज कुठे ना कुठे धाडसत्र राबविले जाते, मात्र तीळमात्रही दारू हद्दपार झाली नाही. शहरातील बेरोजगार युवकांनी नोकऱ्याच मिळत नसल्याच्या कारणावरून दारूविक्री व्यवसाय थाटला आहे. अनेक रस्त्यांवर मद्यपी पडलेले असल्याचे चित्रही नित्याचे झाले आहे. दारूबंदीच्या कामात हातभार लावणाऱ्या महिलांवरच हल्ले होतात. त्यामुळे हे चित्र थांबविण्यासाठी कथोर कायदे करण्याची मागणी संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली. शिष्टमंडळात प्रभा घंगारे, संजय भगत, शबनम शेख, शारदा गजभिये, वंदना कातोरे, बेबी मन्ने यांच्यासह महिलांनी सहभाग नोंदविला.(शहर प्रतिनिधी)
दारूबंदी कायद्याची अंमलबजावणी व्हावी
By admin | Updated: February 9, 2015 23:19 IST