लोकमत न्यूज नेटवर्कसेलू/हिंगणी : बोर व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती झाली; पण बाधित गावांच्या पुनर्वसनाकडे लोकप्रतिनिधी, शासन, प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. शिवाय वाघांच्या हल्ल्यात गुरांसह मनुष्यांनाही जीव गमवावा लागत आहे. यामुळे शासनाला जागे करण्यासाठी बोर व्याघ्र प्रकल्प पुनर्वसन आधार संघर्ष समितीने वनमंत्री मुखदर्शन आंदोलन सुरू केले आहे. यासाठी शनिवारपासून आमगाव ते वर्धा वन विभाग कार्यालय, अशी पदयात्रा आरंभली आहे.सेलू तालुक्यात असलेला बोर व्याघ्र प्रकल्प अल्पकाळात तेथील जैवविविधतेसाठी राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाला; पण काही तासांसाठी येथे वाघ पाहण्यासाठी आलेल्या नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत सर्वांनीच वेळोवेळी ग्रामस्थांनी मांडलेल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. पुनर्वसन न झालेल्या ग्रामस्थांचे दु:ख कधीही जाणून घेतले नाही. प्रकल्पातील गावांचे पुनर्वसन न झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यातच आमगाव (जंगली) येथील चेतन खोब्रागडे या युवकाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने ग्रामस्थांच्या जीवन-मरणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शासनाने सोईस्करपणे या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने वाघाची दहशत व पुनर्वसन न झाल्याने बेजार ग्रामस्थांनी संघटीत होत बोर व्याघ्र प्रकल्प पुनर्वसन आधार संघर्ष समिती तयार केली. या माध्यमातून प्रशासन जागे करण्यासाठी हरिष इथापे व विविध गावांतील युवक, सामाजिक कार्यकर्त्यांनी आमगाव (जंगली) ते वनविभाग कार्यालय वर्धा अशी पदयात्रा काढत वनमंत्री मुखदर्शन आंदोलन सुरू केले.शनिवारी आमगाव ते हिंगणी हा पदयात्रेचा पहिला दिवस पूर्ण झाला. पदयात्रेने ६ किमी अंतर पार केल्यावर वादळी वारा व पाऊस आला. या स्थितीतही शेतकरी, ग्रामस्थ व आधारचे पदाधिकारी सहभागी झाले होते. हिंगणी येथे मंगल कार्यालयात मुक्काम झाल्यानंतर आज सकाळी ७ वाजता पदयात्रा सेलूकरिता रवाना झाली. ही पदयात्रा सोमवारी सकाळी ११ वाजता वन विभागाच्या वर्धा कार्यालयात पोहोचणार आहे.
बोर व्याघ्र प्रकल्पग्रस्तांच्या ‘वनमंत्री मुखदर्शन’ आंदोलनास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 23:50 IST
बोर व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती झाली; पण बाधित गावांच्या पुनर्वसनाकडे लोकप्रतिनिधी, शासन, प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. शिवाय वाघांच्या हल्ल्यात गुरांसह मनुष्यांनाही जीव गमवावा लागत आहे.
बोर व्याघ्र प्रकल्पग्रस्तांच्या ‘वनमंत्री मुखदर्शन’ आंदोलनास प्रारंभ
ठळक मुद्दे आधारचा पुढाकार : आमगाव ते वर्धा वनविभाग कार्यालय पदयात्रा