शेतकरी संकटात : वेचणीच्या वेळेवर आलेल्या रोगामुळे उत्पादन घटण्याची शक्यतावर्धा : यंदा भरपूर पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता; पण तो खोटा ठरला. असे असले तरी पिकांच्या दृष्टीने योग्य पाऊस आला. सोयाबीनला परतीच्या पावसाचा फटका बसला; पण शेतकऱ्यांना काही प्रमाणात पीक हाती लागले. या पावसाचा फटका कपाशीला मात्र सहन करावा लागत असल्याचे दिसते. ओलसरपणा आणि थंडीची चाहुल यामुळे कपाशीवर लाल्या रोगाने आक्रमण केल्याचे दिसून येते. परिणामी, कापसाचे उत्पादन घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पावसाच्या कमी-अधिक प्रमणाचा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसतो. प्रारंभी दुबार-तिबार पेरणी केल्यानंतर काही प्रमाणात सोयाबीन हाती लागले. यातही उताऱ्यामध्ये मोठी तफावत दिसून येते. कुणाला एकरी दहा ते बारा पोते तर काही शेतकऱ्यांना केवळ दोन ते तीन पोटे सोयाबीन झाल्याचे दिसे. या प्रकारामुळे शेतकरी हताश होते. हेच सोयाबीन दिवाळी सणाच्या कामी आले. सध्या कपाशीवर लाल्याने तर तुरीवर अळ्यांनी आक्रमण केले आहे. परिणामी, दोन्ही पिके संकटात सापडली आहेत़ कपाशी व तूर या पिकांतून काही प्रमाणात लावलेला खर्च निघेल, अशी अपेक्षा आहे; पण कपाशीवर लाल्या रोगाने आक्रमण केल्याने कपाशी लाल पडून वाळू लागली आहे. तुरीवर अळ्यांचा मोठा प्रमाणात प्रादुर्भाव दिसत असल्याने ते ही उत्पन्न संकटात सापडले आहे. थंडी पडल्यास तूर पीक वाचू शकते; पण अळ्यांच्या बंदोबस्ताकरिता शेतकऱ्यांना उपाययोजना करणे गरजेचे आहे. लाल्यामुळे कपाशीचे २५ टक्के उत्पन्न तरी घटणार असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जाते. शिवाय भावही पाहिजे त्या प्रमाणात मिळणार नाही. यामुळे खर्च भरून निघणार की नाही, अशी शंका शेतकरी उपस्थित करीत आहेत. तुरीवर अळ्यांनी आक्रमण केल्याने उत्पादन घटण्याची चिन्हे आहेत.(कार्यालय प्रतिनिधी)
कपाशीवर लाल्याचे तर तुरीवर अळ्यांचे आक्रमण
By admin | Updated: November 2, 2016 00:41 IST