पोलिसात तक्रार : संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर विक्रीचा संशयवर्धा : मक्ररसंक्रांतीसाठी एका ग्राहकाने येथीलच एका उपाहारगृहातून सोनपापडी खरेदी केली. ती पॅकबंद असल्यामुळे घरी जाऊन ती उघडून बघितली असता यामध्ये अळ्या आढळल्याने एकच खळबळ उडाली. सदर ग्राहकाने थेट अन्न व औषध प्रशासन विभागाचे कार्यालय गाठून तक्रार केली; मात्र या विभागाचे अन्न निरीक्षक एम.डी. तिवारी यांनी कार्यवाही करण्याची तसदी न दाखविता ती सोनपापडी उपाहारगृह मालकाला परत करून दुसरी मिठाई घेण्याचा अफलवातून सल्ला देऊन हात झटकल्याचा प्रकार शुक्रवारी घडला.यानंतर सदर ग्राहकाने थेट शहर पोलीस ठाणे गाठून बच्छराज मार्गावरील अजय उपाहारगृहाविरुद्ध तक्रार नोंदविली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून योग्य कारवाई करण्याची ग्वाही पोलीस प्रशासनाने दिली. सोनपापडीचा डबा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, नितीन शिंगणे यांनी अजय उपहार गृहातून १ कि.गॅ्र. सोनपापडी व १ कि.ग्रॅ. जिलेबी खरेदी केली. या खरेदीचे त्यांनी बिलसुद्धा घेतले. घरी गेल्यानंतर सोनपापडीचा डबा उघडून बघताच त्यामध्ये अळ्या आढळून आल्या. यानंतर पुढील हालचाली केल्या. यामध्ये अन्न व औषध प्रशासन विभाग किती जागृत आहे. याचा प्रत्यय त्यांना आला. जिल्ह्यात अनेक उपाहारगृहातून उघड्यावर खाद्य पदार्थ विकण्यात येत आहे. याची माहिती असतानाही अन्न व औषधी प्रशासन विभागाच्यावतीने कुठलीही कारवाई करताना दिसत नाही. शिवाय सणांच्या दिवसात या विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून कधी या हॉटेलात जाऊन तपासणी करण्यात आल्याचेही ऐकीवात नाही.(जिल्हा प्रतिनिधी)
सोनपापडीमध्ये अळ्या; अन्न व औषध प्रशासनाने हात झटकले
By admin | Updated: January 16, 2016 02:25 IST