अमोल सोटे आष्टी (श़)गत २२ वर्षांपासून शहीदभूमीच्या ४५० कुटुंबांची अवहेलना सुरू आहे. लेंडी नदीच्या काठावरील दोन्ही बाजुला असलेल्या वस्तीमध्ये दरवर्षी पावसाळ्यात येणाऱ्या पुराचे पाणी जाते़ यामुळे नागरिक त्रस्त आहेत़ वस्तीमध्ये जायला धड रस्ता नाही. मधोमध एकमेव असलेला पूलही जीर्ण झाला आहे. शासनाकडे वारंवार प्रस्ताव पाठवूनही दखल घेतली जात नसल्यासने संरक्षण भिंतीचे घोडे अडले आहे़रंगारपेढ नाल्यापासून वाहणारे पाणी लेंडी नदीला मिळते. याठिकाणी पाण्याचा प्रवाह कमी-अधिक होत असतो़ यामुळे उपलब्ध जागेतून पाणी जात असल्याने ऐनवेळी पाण्याचा धोका उद्भवतो. नदीला लागूनच वस्ती आहे. परिस्थिती जेमतेम असलेली ही कुटुंबे येथे वास्तव्याला आहे. दोन वेळच्या जेवण्याची चिंता असलेल्या कुटुंबांना आपल्या निवाऱ्याला सुरक्षा भिंत बांधण्याची सोय नाही. यामुळे शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे; पण शासकीय उदासिनता आड येत आहे़ या नदीची सिमा दीड किमी गावातून गेली आहे. नदीकाठावर एकूण ४५० कुटुंब असून लोकसंख्या १३०० आहे. आदिवासी व मुस्लीम समाजाचे वास्तव्य आहे. १९९२ मध्ये लेंडी नदीला मोठा पूर आला होता. त्यानंतर २००६ मध्ये पुराने प्रचंड नुकसान झाले. नदीच्या पात्रात धोप्याची पाने व गवत वाढले होते. याची साफसफाई ग्रा़पं़ प्रशासनाने केली होती. काही प्रमाणात नाल्याचे खोलीकरण व नदीचे पात्रही खोल केले होते; पण कालौघात पाण्याच्या प्रवाहाने पात्र पूर्णत: बुजले़या भागातील नागरिक ग्रा़पं़ व पंचायत समितीकडे वारंवार संरक्षण भिंत बांधण्याची मागणी करतात; पण प्रशासन अपूऱ्या निधीमुळे बांधकाम करू शकत नसल्याचे कारण पूढे रेटत आहे़ या परिसराला वॉर्ड क्रमांक दोनचा पुर्व भाग लागून आहे. सध्या या वॉर्डच्या महिला संगीता कौरती आष्टीच्या सरपंच आहेत़ यापूर्वीही शालिनी इरपाची, सुशिला कोडापे या महिला सदस्यांनी वॉर्डाचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांनीही प्रशासनाकडे संरक्षण भिंतीच्या कामासाठी निधीची मागणी केली आहे. शासनाने पूर संरक्षण निधीतून दीड किमी लांबीची भिंत त्वरित बांधून देणे गरजेचे आहे. संघर्ष सरकार दरबारी मांडणारया वॉर्डातील वसंत बोरेकर, रामेश्वर जाधव, अनिल कोडापे, देविदास कोकाटे, महादेव राऊत, सहादेव शेंदरे, जमीला बी, रामदास माने, हफीजा बी, परविन निसा, शेख शकील, शालिनी इरपाची, सुशिला कोडापे यांच्यासह अनेक नागरिक वारंवार प्रशासन दरबारी समस्या मांडत आहेत; पण त्यांच्या निवेदनांना भिक घातली जात नसल्याचेच दिसते़आमदारांनी दिले होते आश्वासनलेंडी नदीच्या काठावरील वस्तीला पुरापासून मुक्त करण्यासाठी पूर संरक्षण भिंतीचे बांधकाम व जीर्ण झालेल्या पूल मोडीत काढून नवीन बांधकाम करून देण्यासाठी शासनाकडे लवकरच प्रस्ताव पाठवून काम मंजूर करून आणणार असल्याचे आश्वासन आमदार अमर काळे यांनी नागरिकांना दिले होते. आता या आश्वासनाची पूर्ती कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़
लेंडी नाला उठला जीवावर ४५० कुटुंबांना धोका
By admin | Updated: February 12, 2015 01:35 IST