रेल्वे मंत्र्यांना साकडे : माजी सैनिक संघाचे निवेदन पुलगाव : येथील रेल्वे स्थानकावर अतिजलद रेल्वे गाड्यांना थांबा देण्याची मागणी गत अनेक वर्षांपासून होत आहे. या मागणीकरिता अनेक वेळा निवेदने रेल्वे प्रशासनाला दिली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत एकाही अतिजलद गाडीला येथे थांबा दिला नाही. या गाड्यांना थांबा देण्याची मागणी येथील माजी सैनिक संघटनेच्यावतीने रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना नव्याने करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून पुलगाव रेल्वे स्थानकावर अतिजलद रेल्वे गाड्यांना थांबा देण्याची मागणी विविध संघटनासह प्रवासी संघटनांनाही रेल्वे मंत्रालयाकडे केली. ५० हजार लोकसंख्येचे सैनिक व कामगारांचे शहर संबोधल्या जाणाऱ्या या शहरात केंद्रीय दारुगोळा भांडार आहे. या दारूगोळा भांडारात देशाच्या विविध भागातील सैनिक व त्याची कुटूंब आहेत. त्यांना गावी जाण्याकरिता याच रेल्वे स्थानकावर उतरावे लागते व परत ते ओझे घेवून मायदेशाकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्याकडे जावे लागते. देशाचे संरक्षणार्थ असलेल्या या सैनिकांची पायपीट रेल्वे मंत्रालयाच्या उदासीन धोरणामुळे होत असल्याचे दिसून येत आहे. उत्तर, दक्षिणकडे किंवा राजस्थान व गुजरातकडे जाणाऱ्या गाड्या या स्थानकावर थांबत नसल्याने अडचण होत आहे. या शहरातून नागपूर- अमरावती-चंद्रपूरकडे हजारो प्रवाशी कर्मचारी विद्यार्थी, व्यापारी, सैनिक यांचे आवागमन होते. मद्रास, दिल्ली, अहमदाबादकडे जाणारे शेकडो सैनिक व व्यापारी या शहरात आहेत. त्यांना थेट रेल्वे गाडी नाही. त्यामुळे या प्रवाश्यांची मोठी पायपीट होते. रेल्वे मंत्रालयाने रोज येणारी नवजीवन एक्सप्रेस, आझाद हिंद एक्सप्रेस, बिलासपूर-पुणे, चैन्नई जोधपूर, ओकापूरी तसे किमान दोन तीन तरी सुपर फास्ट रेल्वे गाड्यांना पुलगाव स्थानकावर थांबा देण्याची मागणी आहे. निवदेन देतेवेळी माजी सैनिक संघाचे अध्यक्ष मनोहर जवळकर, सचिव विनोद राऊत यांच्यासह सदस्यांनी दिले.(तालुका प्रतिनिधी)
अतिजलद रेल्वे गाड्यांचा पुलगावाला खो
By admin | Updated: June 14, 2015 02:24 IST