जमिनीत ओलाव्याचा अभाव : पहिल्या वेच्यानंतर दुसऱ्याची आशा नाही वर्धा : परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्यामुळे सध्या जमिनीत ओल नाही. याचा विपरीत परिणाम तूर, कपाशीवर होत असल्याचे दिसून येत आहे. उत्पन्न निघण्याच्या ऐन काळात ही पिके वाळू लागली आहेत. सध्या तूर फुलांवर आली असून शेंगा येणे सुरू झाले आहे. कपाशीची बोंडे मोठी होण्याची वेळ आहे. निसर्गाच्या होत असलेल्या अवकृपेमुळे ही दोन्ही पिके शेतात अपरिपक्व अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. उसनवारी व कर्ज काढून शेतकऱ्यानी खरीप हंगामात पेरणी केली. यात सोयाबीनने धोका दिल्याने त्यांच्या आशा आता कपाशी व तुरीवर आहेत. जिल्ह्यात या दोन पिकांची लागवड पारंपारिक पीक म्हणून करण्यात येते. या दोन पिकांच्या आधारावर शेतकऱ्यांचे बजेट असल्याचा इतिहास आहे; मात्र पावसाने दगा दिल्याने ही पिके धोक्यात आली आहेत. पावसाअभावी जमिनीत ओल कमी असल्याने दोनही पिके धोक्यात आली आहे. अशात परतीचा पाऊस येईल असे वाटत असताना शेतकऱ्यांना मोठी हुलकावणी मिळाली. यामुळे तूर, कपाशीचे पीक वेळेपूर्वीच वाळत आहे. शेतात असलेला कापूस वेचण्याचे काम सुरू झाले आहे. यात पहिला वेचा संपण्याची वेळ आली आहे. काही दिवसानंतर शेतकऱ्यांकडून दुसरा वेचा केल्या जातो. या दुसऱ्या वेच्यात त्यांच्या हाती कापूस येईल अथवा नाही हे सांगणे कठीण झाले आहे. कपाशीची झाडे पूर्णत: वाळत चालली आहेत तर काही ठिकाणी लाल्या आला आहे. (प्रतिनिधी)
कपाशीसह तूरही धोक्यात
By admin | Updated: November 15, 2015 01:27 IST