लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोविडचा संसर्ग होऊन मृत्यू झालेल्या व्यक्तीवर संभाव्य धोका लक्षात घेऊन बोटावर मोजण्या इतक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार केले जात आहेत. मृत व्यक्तीचे नातेवाईकही बहुदा रक्षाविसर्जनासाठी राख नेत नसून दिवसेंदिवस कोविडमुळे मृत्यूची संख्या लक्षात घेऊन अंत्यसंस्कार करणारेही गहिवरत आहेत. याच विदारक परिस्थितीत कोविड मृतांची राख इंझापूर भागातील न.प.च्या डम्पिंग यार्ड परिसरात खड्डा करून पुरविली जात आहे. वर्धा नगरपालिकेने आतापर्यंत वर्धा वैकुुंठधामातील १५ ट्रॅक्टर राखेची विल्हेवाट लावली आहे.वर्धा येथे मृत कोविड बाधितांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी पाच स्मशानशेड तर चार स्मशानओटे आहेत. मे, २०२० ते ७ मे, २०२१ या कालावधीत वर्धा येथील कोविड स्मशानभूमीत तब्बल १ हजार ३८२ मृत कोविडबाधितांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे मृत कोविड बाधिताचे नातेवाईकही मृताची राख रक्षाविसर्जनासाठी नेत नाहीत. त्यामुळे वर्धेच्या कोविड स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणात राख साचली होती. हिच राख वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात इंझापूर भागात ३२ एकरात पसरलेल्या वर्धा न.प.च्या डम्पिंग यार्डवर खड्डा करून पुरविण्यात आली असून, वेळोवेळी मृतांची राख डम्पिंग यार्डच्या परिसरात पुरविण्यात येत आहे.
मोजकेच व्यक्ती नेतात केवळ पूजनापुरती अस्थीnवर्धा येथील कोविड स्मशानभूमीत ७ मे रोजीपर्यंत १ हजार ३८२ मृत कोविडबाधितांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. त्यापैकी अनेक कोविड मृतक हे जिल्ह्याबाहेरील रहिवासी आहेत. जिल्ह्यात लागू असलेल्या सक्तीच्या संचारबंदीसह कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे अनेक नागरिक मृत कोविडबाधिताची राख रक्षाविसर्जनासाठी नेत नाहीत, तर काही मोजकेच व्यक्ती केवळ पूजनासाठी अस्थी नेत असल्याचे सांगण्यात आले.
जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या कठोर निर्बंधांमुळे नवीन कोविडबाधित सापडण्यासह कोविड मृतांच्या संख्येत घट झाली आहे. पूर्वी दररोज २० ते २५ कोविड मृतांवर अंत्यसंस्कार व्हायचे, तर आता ही संख्या बऱ्यापैकी रोडावली आहे. पुर्वी नि:शुल्क अंत्यसंस्कार व्हायचे, पण आता नाममात्र शुल्क घेत आहे.- राजेंद्र राजपुरोहित, स्मशानजोगी, वर्धा.
७ मे पूर्वीपर्यंत वर्धा वैकुठधामातील कोविड स्मशानभूमीत १ हजार ३८२ मृत कोविड बाधितांवर नि:शुल्क अंत्यसंस्कार करण्यात आले. तर सध्या नाममात्र शुल्क म्हणून २ हजार ५०० रुपये घेतले जात आहे. सुमारे १५ ट्रॅक्टर राख इंझापूरच्या डम्पिंग यार्डवर पुरविण्यात आली आहे.विपीन पालिवाल, मुख्याधिकारी, न.प. वर्धा.
८ मेपासून घेतले जातेय नाममात्र शुल्क- ७ मे रोजीपर्यंत वर्धा नगरपालिका प्रशासनाने वसुंधरा वुडलेसच्या सहकार्याने १,३८२ मृत कोविडबाधितांवर नि:शुल्क अंत्यसंस्कार केलेत, परंतु सरण व इतर साहित्यासाठी पैसे मोजावे लागत असल्याने व नि:शुल्क अंत्यसंस्कार वर्धा न.प.ला परवडणारा नसल्याने, ८ मे रोजीपासून मृत कोविडबाधितावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नाममात्र शुल्क म्हणून २ हजार ५०० रुपये घेतले जात आहेत.
पूर्वी झाले नि:शुल्क अंत्यसंस्कार- वर्धा नगरपालिका प्रशासनाने ७ मे पुर्वीपर्यंत वर्धा येथील कोविड स्मशानभूमीत तब्बल १ हजार ३८२ मृत कोविड बाधितांवर नि:शुल्क अंत्यसंस्कार केले. तर सध्या नाममात्र शुल्क म्हणून २ हजार ५०० रुपये घेतले जात असल्याचे सांगण्यात आले.