लुटमारीचे अनेक गुन्हे हिंगणघाट : येथील राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव चौकाजवळच्या भवन्स शाळेसमोर येथील कुख्यात गुंड दीपक राऊत (३२) रा. गोमाजी वॉर्ड हा जखमी अवस्थेत मिळून आला. त्याचा उपचाराकरिता नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चौकशीअंती त्याला मृत घोषित केले. ही घटना शुक्रवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास घडली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपकवर अवैध दारू, मारामारी, लुटमार, खुनाचा प्रयत्न आदी गुन्हे दाखल आहेत. पाच वर्षांपूर्वी अल्ला कामडी खून प्रकरणातून त्याची निर्दोष सुटका झाली होती. या मार्गाने जाणाऱ्या अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांना अडवून पैसे वसुलीच्या प्रकारामुळे येथून रेतीची वाहतूक करणारे त्रस्त झाले होते. याच कारणावरून दीपकवर प्राणघातक हल्ला झाल्याची चर्चा शहरात आहे.दीपक रात्री १२ वाजताच्या सुमारास नांदगाव चौरस्त्यात जखमी अवस्थेत पडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णलयात आणले; मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला वर्धा जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासाअंती त्याला मृत घोषित केले. याबाबतची मर्गची डायरी आली नसल्याने वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल नव्हता. या प्रकरणाचा तपास प्रभारी ठाणेदार विजय नाईक करीत आहेत.(तालुका प्रतिनिधी)
शहरातील कुख्यात गुंडाची हत्या
By admin | Updated: June 13, 2016 00:37 IST