टाळमृदंगाचा निनाद, भगव्या पताका, वेणूचा नाद, राम कृष्णहरी नामाचा जप, केजाजी नामाच्या जयघोषाने घोराड नगरी दुमदुमली़ निमित्त होते, संत केजाजी महाराजांच्या १०८ व्या पुण्यतिथी महोत्सवाचे!बुधवारी झालेल्या दिंडी पालखी सोहळ्यात विदर्भातील २५० हून अधिक भजनी दिंड्या सहभागी झाल्या होत्या. पहाटेपासून गावोगावच्या भजनी दिंड्यांसह भाविक घोराडमध्ये मिळेल त्या वाहनाने दाखल होत होते. सकाळी १० वाजता विठ्ठल-रूख्माई देवस्थानमधून पालखी सोहळ्याला सुरूवात झाली. पंढरपूरच्या पायदळ वारीत होणाऱ्या वाखरीच्या रिंगणाची आठवण संत नामदेव महाराज समाधी मैदानावर झालेला रिंगण सोहळा भाविकांना आनंद देत होता. आजच्या दिंडी सोहळ्यामुळे बोरतिर्थावर २५० पेक्षा अधिक भजनी दिंड्या सहभागी झाल्या तर २५ हजार भाविकांची या सोहळ्याला उपस्थिती असल्याने गावातील सर्वच रस्ते भाविकांनी फुलून गेले होते. प्रत्येक भजनी दिंडीतील विणेकऱ्यांचे पाय धुवून कुमकुम तिलक लावले जात होते़ दिंडी मार्गाचे रस्ते फुलांच्या पाकळ्यांनी सजले होते. डोळ्याचे पारणे फेडणारा हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी सकाळपासून सोहळा संपेपर्यंत सेलू व हिंगणीकडून येणारा मार्ग वाहनांच्या गर्दीने भरलेला होता. संत केजाजी महाराजांच्या १०८ व्या पुण्यतिथीनिमित्त प्रत्येक भाविक भक्तीमय वातावरणात भक्तीरसाचा आनंद घेत होता़
केजाजी नामाच्या जयघोषाने घोराडनगरी दुमदुमली
By admin | Updated: January 22, 2015 01:55 IST