आज नेत्यांची कसोटी : सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेची अध्यक्षपदी वर्णी लागणारवर्धा : जिल्हा परिषदेच्या नव्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी रविवारी निवडणूक होत आहे. यात नव्या अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. आघाडीतील नऊ सदस्य आघाडीपासून अंतर ठेवून आहे. या सदस्यांच्याच हातात सत्तेची किल्ली असली तरी आघाडी सत्ता टिकविण्यात यश मिळविते वा भाजप पहिल्यांदा जिल्हा परिषदेवर भगवा फडकावते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे.५१ सदस्य संख्या असून बहुमताकरिता २६ चा आकडा जुळवावा लागणार आहे. ही जुळवाजुळव करण्यासाठी आघाडीतील नेते प्रयत्नरत आहेत. मात्र काही तब्बल नऊ सदस्य अद्यापही संपर्कात नसल्यामुळे चांगलीच कोंडी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत काँग्रेस-१६, राष्ट्रवादी-८, अपक्ष-१ असे संख्याबळ असून शेतकरी संघटनेनेही वाटाघाटीनंतर आघाडीच्या मांडीला मांडी लावून लावून बसण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. यामुळे पुन्हा एकदा आघाडीची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नऊ सदस्य सहलीवर गेलेले असून ते आघाडीच्या संपर्कात नसल्याने बहुमत असूनही सत्ता स्थापनेत खोडा येण्याची शक्यता आहे.भाजप नेत्यांनी यंदा कोणत्याही परिस्थितीत जि.प.वर झेंडा फडकविण्याचा निर्धार केला आहेत. यासाठी पळवापळवीचे राजकारण सुरू झालेले आहेत. अशातच सहलीला गेलेले आघाडीतील नऊ जि.प. सदस्य भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. या सदस्यांनी भाजपशी हात मिळवणी केली असल्याचीही चर्चा आता सर्वसामान्य झाली आहे. ही मंडळी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार नसल्याची दाट शक्यता आहे. असे झाल्यास आघाडीला मोठा हादरा बसणार आहे. हिच संधी साधून भाजपने जि.प. वर आपला झेंडा फडकाविण्याची रणनिती आखली आहे. या राजकीय हालचालीमुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीची चुरस चांगलीच वाढली आहे. भाजपाच्या खेम्यात भाजप १८, शिवसेना-१, अपक्ष-४ चार असे संख्याबळ आहे. बहुमतासाठी पुन्हा तीन जागांची गरज आहे. मात्र काँग्रेस व राष्ट्रवादीचे काही सदस्य गैरहजर भाजपचा अध्यक्ष होईल, असे गणित मांडले जात आहे. एकूणच ही निवडणूक भाजप आणि आघाडीतील सदस्यांना वाटते तितकी सोपी राहिलेली नाही. यात दोन्ही गटातील नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागलेली आहे. यात कोण बाजी मारतो, याचे रहस्य उलगडण्याकरिता काही तासांचाच अवधी शिल्लक आहे.(जिल्हा प्रतिनिधी)
‘त्या’ नऊ सदस्यांच्या हाती सत्तेची किल्ली
By admin | Updated: September 20, 2014 23:54 IST