रात्री १० नंतर उडते प्रवाशांची तारांबळ : वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज महेश सायखेडे वर्धा जिल्ह्याचे स्थळ असल्याने वर्धा बसस्थानकावर नेहमीच प्रवाशांची मोठी गर्दी असते. येथून जिल्ह्यातील गाव-खेड्यात व जिल्ह्याबाहेर नियोजित ठिकाणी जाण्यासाठी नागरिक येथून बसमध्ये चढतात. परिणामी, दिवसभर येथे प्रवाशांसह विद्यार्थ्यांची चांगलीच रेलचेल असते. जिल्ह्याच्या स्थळावरून बोटावर मोजण्या इतक्याच रातराणी बसेस सोडल्या जात असून रात्री १० नंतर अनेक ठिकाणी जाण्यासाठी बसेसच उपलब्ध नसल्याने प्रवाशांची तारांबळ उडते. सदर प्रकाराकडे लक्ष देत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य कार्यवाही करणे गरजेचे आहे. रापमच्यावतीने प्रवाशांच्या सुविधेसाठी विविध योजना राबविल्या जात असल्या तरी जिल्ह्यात अनेक भंगार बसेसच धावतात. यामुळे रापमच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ अशी कागदोपत्री हाकाटीच राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने नेहमी केली जात असल्याची ओरड प्रवाशांतून होत आहे. रात्रीच्या सुमारास जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या प्रवाशांना सुविधा देणे क्रमप्राप्त असताना बोटावर मोजण्या इतक्याच रातराणी धावतात. परिणामी, रात्री १० नंतर प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडते. नागपूरकडे जाण्यासाठी पंढपूर-नागपूर, सोलापूर-नागपूर, लातुर-नागपूर, बुलढाणा-नागपूर, नांदेड-नागपूर, परळी-नागपूर या सहा रातराणी बसेस वेगवेगळ्या वेळेत वर्धा बस स्थानकावरून प्रवाशांच्या सेवेसाठी सोडल्या जातात; पण वर्धा बसस्थानकावरून इतर ठिकाणी जाण्यासाठी रात्री १० नंतर रातराणी बसेस नसल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. यामुळे रापमचेही नुकसान होते. रात्री उशारापर्यंत बसेसच नसल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे रापमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे. यवतमाळची रात्री १२ नंतर बसच नाही नागपूर आगाराकडून प्रवाशांच्या सेवेसाठी नागपूर-पंढरपूर ही बस कार्यरत आहे. सदर बस वर्धा बस स्थानकावर मध्यरात्री १२.०५ वाजाताच्या सुमारास येते. या बसनंतर यवतमाळकडे जाण्यासाठी थेट सकाळी ६ वाजता नागपूर-उमरखेड ही बसफेरी आहे. नागपूर-पंढरपूर बसनंतर दिवस उजाडेपर्यंत कुठलीच बस वर्धा बसस्थानकातून यवतमाळच्या दिशेने धावत नसल्याने प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतो. अनेकदा तर प्रवाशांना बसस्थानकावरच रात्र घालवावी लागते. अमरावतीसाठी सुटते ८.३० वाजता शेवटची लालपरी वर्धा बसस्थानक येथून अमरावतीच्या दिशेने जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे; पण रात्री ८.३० वाजताच्या अहेरी-अमरावती या बसनंतर कुठलीही बस वर्धा बस स्थानकातून अमरावतीसाठी सुटत नाही. परिणामी, अनेक प्रवाशांना रेल्वे वा खासगी बसचा प्रवास करून आपले नियोजित स्थळ गाठावे लागत आहे. प्रवाशांची समस्या लक्षात घेता या मार्गावर रात्री उशीरापर्यंत बससेवा देण्याची मागणी आहे.
जिल्हास्थळावरून मोजक्याच ‘रातराणी’
By admin | Updated: January 19, 2017 00:14 IST