सेलू : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील नवनिर्मित नगर पंचायती, नगर परिषदेच्या निवडणुका व काही पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राजकारण्यांच्या धावपळीला वेग आल्याचे सध्या दिसून येत आहे. १ नोव्हेंबरला मतदान होणार असल्याने राजकीय पक्ष व इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. नगर पंचायतीच्या पहिला प्रमुखाचा मान कुणाला मिळणार, यासाठीही चढाओढ सुरू झाल्याचे दिसते.सेलू ग्रामपंचायत असताना जयस्वाल गटाची सत्ता होती. हा गट काँग्रेसशी जुळलेला आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसचा स्थानिक जयस्वाल गट आणि शेखर शेंडे यांच्या गटाने वैर मिटवून एकत्र येत माजी आमदार सुरेश देशमुख यांच्याशी युती करून त्रिकुट तयार केले. यात भाजपाला सरळ लढत देत त्यांना एकही जागा मिळू दिली नाही. यानंतर झालेल्या सभापती-उपसभापती पदाच्या निवडणुकीत जयस्वाल गट वगळला गेला होता. नगरपंचायतीमध्ये जयस्वाल गटाविरूद्ध भाजपा, शिवसेना आणि अपक्ष, असे अनेकजण लढणार आहे. यामुळे ही निवडणूक कुणालाही सोपी राहणार नाही. ऐन वेळेपर्यंत नेमकी काय स्थिती निर्माण होते, यावर सर्वांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. यासाठी सर्वच कंबर कसणार असल्याचे दिसते.(तालुका प्रतिनिधी)नगर पंचायत रचनेमध्ये १७ वॉर्ड व तेवढेच सदस्यभाजप, शिवसेना, जयस्वाल व शेखर शेंडे गट आणि काही अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात राहणार आहेत. नगरपंचायत रचनेमध्ये १७ वॉर्ड आणि १७ सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. यामुळे कुणाची किती राजकीय ताकद आहे, हे या निवडणुकीत सिद्ध होणार आहे. ग्रामपंचायत असताना सहा वॉर्ड आणि एका वॉर्डातून तीन उमेदवार निवडून द्यावयाचे होते. यात गटनिहाय फायदा होत होता. उमेदवारांना गटनिहाय निवडून येणेही सोपे होते; पण आता एक वॉर्ड एक सदस्य असल्याने खरी लढत होणार आहे. सत्तारूढ जयस्वाल गटाविरूद्ध सर्वच स्थानिक गट एकत्र येऊन पाच वर्षांपूर्वी ग्रामपंचायत निवडणूक लढले होते. त्यावेळी १७ पैकी १३ सदस्य जयस्वाल गटाचे निवडून आले होते. आता नगर पंचायतीच्या निवडणुकीत कोणती खेळी खेळली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. राजकीय उलथापालथीमुळे दूरगामी परिणामबाजार समितीच्या निवडणुकीत झालेल्या राजकीय उलथापालथीमुळे नगरपंचायत निवडणुकीवर दूरगामी परिणाम होणार आहे. शिवाय उलटसुलट चर्चाही सुरू झाल्या आहेत. आता काँग्रेसच्या गटाची पुन्हा पूर्वीप्रमाणे विभागणी झाल्याने जयस्वाल विरूद्ध शेंडे गट, अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
निवडणूक जाहीर होताच राजकारण्यांची धावपळ
By admin | Updated: October 2, 2015 06:49 IST