मगन संग्रहालय समितीचा उपक्रम : प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरणसमुद्रपूर : ग्रामीण परिसरातील युवक-युवतींना वेल्डींग, फॅब्रिकेशन, गारमेंट मेकिंग या व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन रोजगाराचे धडे देण्यात आले. मगन संग्रहालय समितीच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आला. स्वत:चा उद्योग उभारण्यासाठी ग्रामीण युवा वर्गाला आत्मविश्वास मिळावा म्हणून हे प्रशिक्षण घेण्यात आले.भारतीय युवाशक्ती ट्रस्टचे क्षेत्रिय अधिकारी देवेंद्र सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशिक्षनार्थींना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. याप्रसंगी बोलताना देवेंद्र सिंग म्हणाले, स्वत:चा उद्योग उभारायचा असेल तर आत्मविश्वास ठेवत तसे स्वप्न बाळगा, असे आवाहन केले. या माध्यमातून १८ ते ३५ वयोगटातील युवा वर्गाला प्रशिक्षण देण्यात आले. तसेच बजाज फाऊंडेशनच्यावतीने उद्योजकता विकास कार्यक्रम अंतर्गत मार्गदर्शन व आधार दिला जातो, अशी माहिती यावेळी दिली. मगन संग्रहालय समितीच्या गिरड उपकेंद्रावर आयोजित प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाला संस्थेचे प्रभारी गजानन गारघाटे, अधिष्ठाता अतुल शर्मा, प्रशिक्षक राजेंद्र बावणे, वृंदा ढोके तसेच कार्यकर्ता उपस्थित होते. निलेश भिसेकर यांना वर्कशॉप सुरू करण्यासाठी ग्राम विकास तंत्रनिकेतन, पिपरी तर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या यंत्राची माहिती दिली. ग्रामीण परिसरातील अशा बेरोजगारांकरिता अन्य व्यवसायांच्या प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी यावेळी गारघाटे यांनी केली. प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थींनी मनोगत व्यक्त केले. आयटीआयमध्ये प्रवेश न मिळालेल्या मुलांनाही व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन रोजगार करण्याची संधी प्राप्त झाली आहे. तंत्रशुद्ध मार्गदर्शनात दिलेल्या प्रात्यक्षिकामुळे रोजगाराचा मार्ग सुकर झाल्याचा सूर व्यक्त झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्पाच्या कम्युनिटी डेव्हलपमेंट समन्वयक आरती प्रांजळे-घुशे यांनी केले. मानव संसाधन विकास मंत्रालय, नवी दिल्ली अंतर्गत ग्रामीण विकासाच्या प्रकल्पाची सविस्तर माहिती त्यांनी यावेळी दिली. यानंतर मान्यवरांनी सहभागी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र प्रदान केले. उपक्रमाला संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)
व्यावसायिक प्रशिक्षणातून रोजगाराचे धडे
By admin | Updated: June 17, 2016 02:33 IST