स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : १६ लाखांचा मुद्देमाल जप्तवर्धा : बांधकामाकरिता लागणारी सळाख दरोडा टाकून लुटण्याच्या घटनांत वाढ झाली होती. याबाबतच्या तक्रारींवरून तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेने टोळीला जेरबंद केले. त्यांच्याकडून १६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.पुलगाव पोलीस ठाण्यांतर्गत गुंजखेडा येथे जी.एस.डी. इंडस्ट्रीज नागपूर या कंपनीचे बांधकाम सुरू होते. सदर बांधकाम सुरू असताना २ आॅगस्ट रोजी रात्री ५ ते ६ अज्ञात इसमांनी बांधकामावरील सुपरवायझरला चाकूचा धाक दाखवित दोरीने बांधून ठेवले. बांधकामाकरिता आवश्यक असणाऱ्या सळाखी ट्रकमध्ये जबरीने भरून घेत पलायन केले. याबाबत तक्रारीवरून पुलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पराग पोटे यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास करताना जिल्ह्यात दाखल असलेल्या अशा गुन्ह्यांवर लक्ष केंद्रीत केले. या प्रकारचे जिल्ह्यातील पुलगाव, हिंगणघाट, समुद्रपूर व सावंगी पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहे. सर्व पोलीस ठाण्यांतून अंदाजे ३० टण सळाख अंदाजे किंमत ९ लाख रुपयांचा माल चोरी गेल्याचे आढळले. चोरीची पद्धत एकच असल्याचेही निष्पन्न झाले. पोटे यांच्या निर्देशानुसार उपनिरीक्षक अचल मलकापुरे व गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी तपास केला. प्राप्त माहितीवरून कामठी येथील एका टोळीवर लक्ष केंद्रीत करीत नसीम खॉ. फिरोज खॉ (२३) रा. सैलाबनगर कामठी, शुभम उर्फ कादर भाऊराव मेश्राम (२५) रा. अंगुली मार्ग नारा रोड नागपूर, प्रतिक माणिक फुलझेले (५१) रा. कामठी, रितेश प्रदीप वासनिक (२३) रा. कामठी, अक्षय देवानंद लांजेवार रा. कळमना रोड कामठी, प्रदीप उर्फ योगेश भास्कर मेश्राम (२३) रा. कामगार नगर कामठी यांना शिताफीने अटक केली. सदर टोळीचा म्होरक्या वसीम हैदर रा. कामठी जि. नागपूर हा अद्याप फरार आहे. त्याचा शोध घेणे सुरू आहे.आरोपी हे सळाख दुकान तसेच बांधकाम ठिकाणांच्या समोरील सळाखींवर पाळत ठेवत. रात्री दरोडा घालून सळाखीचा माल लुटून नेत होते. अटक केलेल्या आरोपीतांनी जिल्ह्यातील हिंगणघाट, समुद्रपूर व सावंगी तसेच भंडारा, नागपूर, गोंदिया या जिल्ह्यांत विविध गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यात लुटून नेलेल्या सळाखी व वापरलेले दोन ट्रक असा १६ लाख ५० हजार रुपयांचा माल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक पराग पोटे यांच्या निर्देशानुसार पोलीस उपनिरीक्षक अचल मलकापुरे व गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केली.(तालुका प्रतिनिधी)
सळाख लुटणारी टोळी जेरबंद
By admin | Updated: October 13, 2016 01:22 IST