लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : शहरातील नेहरू मार्केट, गोल बाजार, इंदिरा चौक, नेताजी मार्केट, आठवडी बाजारसह शहरातील अनेक भागात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वाहन तर सोडा पायदळ चालणे मुश्कील होत आहे. थोडा जरी धक्का लागला तरी वादविवाद होत आहेत.
अनेक भागात उघड्यावर कचरा टाकला जात आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परंतु संबंधित विभागाचे अधिकारी या समस्येकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. तसेच नगरपालिकेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यावर कोणाचेही अंकुश राहिले नाही. त्यामुळे अनेक विभागाचे विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मनमानी कामकाज सुरू ठेवले आहे. नगरपालिकेच्या विविध विषयांवरील प्रश्नांची उकलच होत नसल्याने नागरिकावर मुख्याधिकारी साहेब थोडा कार्यालय बाहेर येऊन बघा हो।, असे म्हणण्याची वेळ आता नागरिकांवर आली आहे.
बगिचे पडले ओसशहरात प्रत्येक ठिकाणी प्लास्टिकचा वावर वाढला आहे. हे प्लास्टिक जनावरे त्या खात आहेत. त्यामुळे जनावरांच्या आरोग्यावरील विपरीत परिणाम होत आहे. शहरात अटलबिहारी उद्यान एकमेव बगिचा अनेक महिन्यांपासून बंद आहे. नगरपालिका क्षेत्रातील व बसस्थानकावरील बगिचासह इतर चार बगिचे ओस पडले आहेत. त्यात गाजर गवत आणि काटेरी झुडपे आहे.
शहरात कचऱ्याचे ढीग...शहरातील अनेक वार्डात कचरा पडलेला आहे. परंतु हा कचरा उचलण्यास कोणी तयार नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देवून शहरातील साचलेले कचऱ्याचे ढीग उचलण्यात यावे व शहरातील जाम झालेल्या नाल्या मोकळ्या करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे
कचरा संकलन अद्यापही थंडबस्त्यातच !आर्वी शहरात मोकाट जनावराचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. पंधरा वर्षानंतर कोंढवाडा सुरू झाला होता. मात्र, मागील वर्षीपासून नगरपालिकेने तोही बंद केला. शहरात घंटागाडी कधी कधी शहरात फिरते. मात्र, कचरा संकलनाची प्रक्रिया २०१० पासून थंड बस्त्यातच आहे. याकडे मुख्याधिकारी यांची दुर्लक्ष असल्याची नागरिकांची ओरड आहे.
२३ वार्डशहरात २३ वार्ड आणि ११ प्रभाग आहेत. या सर्व प्रभागात मोठ्या प्रमाणात नाल्या तुंबल्या आहेत. या नाल्यातील गाळ काढल्या जात नाही तसेच थातूरमातूर काम करून पाण्याला वाट करून दिली जाते. शहरात साफसफाई केल्या जात नाही. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आहे.
"आर्वी शहराला अनेक समस्येच्या विळखा आहे. स्वच्छता अभियाचा बोजवारा उडाला आहे. जागोजागी अनेक जागेवर अतिक्रमण आहे. मात्र, कर्मचारी अधिकारी याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. मुख्याधिकारी सर्व काही करू शकतात. मात्र, तेही गांधारीच्या भूमिकेत असल्याचे जाणवते."- रोहन हिवाळे, तालुका अध्यक्ष संभाजी ब्रिगेड
"शहरातील बगिचे ओस पडले आहेत. परंतु अधिकारी व कर्मचाऱ्यांचे याकडे लक्ष नाही. नगरपालिका नेहमी नेमकी कोणती कामे करतात हेच कळत नाही. अनेक जण चहा टपरीवर पानठेल्यावर दिसतात. याकडे लक्ष देण्याची गरज आहे."- पंकज गोडबोले, नागरिक, आर्वी