प्रतीक्षा कायम : आर्वी उपविभागात अनुदानच नाहीआर्वी : धडक सिंचन योजनेंतर्गत आर्वी उपविभागातील मंजूर सिंचन विहिरीचे काम अनुदानाअभावी रखडले आहे. यात आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यातील लाभार्थी गत सहा वर्षापासून सिंचन विहिरीच्या अनुदानाची प्रतीक्षा करीत आहे. मात्र पावसाळ्यापूर्वी या सिंचन विहिरींचे काम पूर्ण करायचे असल्याने लाभार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.पाटंबधारे विभागाच्या धडक सिंचन योजनेंतर्गत अनुसूचित जाती व जमाती यासह इतर लाभार्थ्यांना सिंचन विहिरीचे बांधकाम करण्यासाठी शासनाकडून अनुदान मिळते. यात एक लाख रुपये दिले जाते. या योजनेअंतर्गत २००६-७, २००८-०९ या वर्षात मंजूर लाभार्थ्याना पाच वर्षापासून सिंचन विहिरीचे अनुदान मिळालेले नाही. या योजनेत आर्वी तालुक्यातील १०० विहिरींचा समावेश आहे. त्यापैकी ७० लाभार्थ्यांना विहिरींचे अनुदान मिळाले आहे. कारंजा तालुक्यात ५८ सिंचन विहिरी मंजूर आहे. त्यापैकी ३० विहिरीचे काम पूर्ण आहे. या सर्व विहिरी नरेगा अंतर्गत पूर्ण करण्याचे उदिष्ट असून ३० जून पर्यंत या विहिरी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शासनाकडून सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी विविध शासकीय योजना राबविल्या जाते. परंतु पाटबंधारे विभागाच्यावतीने धडक सिंचन विहिरी योजनेंतर्गत लाभार्थ्यांचे अनुदान रखडले व सिंचन विहिरीचे बांधकाम रखडल्याने लाभार्थी अडचणीत आले आहे.पावसाळ्याच्या तोंडावर सिंचन विहिरीचे अनुदान व बांधकाम रखडले आहे. गेल्या पाच वर्षापासून हे अनुदान रखडल्याने लाभार्थी अडचणीत आले आहे. या सिंचन विहिरीचे नरेगा अंतर्गत बांधकाम करायचे आहे. परंतु कामाकरिता मजूर मिळत नसल्याने अनेक विहिरीचे काम रखडल्याची स्थिती आहे. विहिरीचे काम पूर्ण झाले लाभार्थ्यांना अनेक समस्या भेडसावत आहे. याबाबत शासनाने उपाययोजना करुन लाभार्थ्यांना विहिरीचे बांधकाम करण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.(तालुका प्रतिनिधी)
सिंचन विहिरी चार वर्षांपासून रखडल्या
By admin | Updated: June 14, 2014 23:46 IST