अनेकांचा चुकतो मार्ग : स्तंभाची स्वच्छता करण्याची मागणीवायगाव (नि.) : गावालगत चौरस्ता असून तेथून राळेगाव, हिंगणघाट, चंद्रपूर, पुलगाव, अमरावती, देवळी, वर्ध्याकडे जाणारे मार्ग आहे. या चौरस्त्यावर बांधकाम विभागाद्वारे दिशादर्शक स्तंभ बांधण्यात आला आहे; पण गावे दर्शविणाऱ्या या स्तंभाचे फलक सध्या पूर्णत: पुसले गेले आहे. अनेक कंपन्यांनी जाहिरातीची पत्रके चिकटविण्याची ती हक्काची जागा करून घेतली आहे. यामुळे दिशादर्शक फलकाला जाहिरातींचा विळखा दिसून येतो.जाहिरातींच्या पत्रकांनी दिशादर्शक स्तंभ झाकला गेल्याने ये -जा करीत असलेल्या प्रवाश्यांना गावांची नावे तसेच दिशादर्शक चिन्हे दिसून येत नाही. यामुळे बरेचदा प्रवाश्यांचा मार्ग चुकतो. बरेच दूर गेल्यावर त्यांना आपण चुकीच्या रस्त्याने जात असल्याचे लक्षात येते. हा प्रकार येथे अनेकदा येथे घडतो. या मार्गावर राज्याच्या बाहेरील वाहनांचीही वर्दळ असते. चंद्रपूर, अमरावतीकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या अधिक असते; पण चौरस्त्यावर असलेल्या स्तंभावरील गावे दर्शविणारे फलक पूर्णत: पुसले गेल्याने प्रवाश्यांचा गोंधळ होतो. जड वाहनांनाच नव्हे तर दुचाकी, चारचाकी वाहन चालकांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या स्तंभावर रेडिअमचे पट्टेही लावण्यात आले होते. रात्रीच्या वेळी लाईटच्या प्रकाशाने ते चमकत असल्याने स्तंभ असल्याचे दिसून पडत होते; पण सध्या स्तंभाला जाहिरातीच्या पत्रकांनी वेढा दिला आहे. यामुळे रेडियम पूर्णत: झाकले गेले आहे. ये-जा करणाऱ्या वाहनांना स्तंभ दिसून येत नसल्याने अपघात होतात. अशा प्रकारे अनेक अपघात या चौरस्त्यावर झाले आहेत. ट्रक चालक रस्ता चुकून भलतीकडेच जाण्याच्या घटना तर नित्याच्याच झाल्या आहेत.हा प्रकार टाळण्याकरिता वायगाव (नि.) चौकात मध्यभागी असलेल्या स्तंभाची स्वच्छता करून त्यावर गावांची दिशा व नाव पुन्हा टाकावे. रात्री स्तंभ ठळकपणे दिसून येण्यासाठी रेडियम लावावे, अशी मागणी प्रवाश्यांकडून करण्यात येत आहे. ग्रामस्थ व प्रवाश्यांनी याबाबत पोलीस उपनिरीक्षक एस.पी. निंबाळकर यांच्याकडे याबाबत निवेदनेही सादर केली. संबंधित विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.(वार्ताहर)वायगाव येथील चौरस्त्यावर उभारलेल्या स्तंभावर बांधकाम विभागाने रेडियमचे पट्टे लावले होते. रात्रीच्या वेळी ते वाहनांच्या लाईटमुळे चमकत असते. यामुळे स्तंभ असल्याचे दिसून पडत होते; पण सध्या या स्तंभाला जाहिरातीच्या पत्रकांनी विळखा दिल्याने रेडियम पूर्णत: झाकले गेले आहे. ये-जा करणाऱ्या वाहनांना स्तंभ दिसून येत नसल्याने अपघात होतात. याकडे लक्ष देत कारवाईची मागणी होत आहे.
दिशादर्शक स्तंभाला जाहिरातींचा वेढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2015 01:56 IST