कार्यवाहीवर संबंधितांचे दुर्लक्ष : ठिकठिकाणी दिसतात रेतीसाठ्याचे डोंगरवर्धा : रेतीचा अवैध साठा करीत असलेल्या जिल्ह्यातील साठेबाजांवर दंडात्मक कारवाही करण्याचे आदेश संबंधीत अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. असे असतानाही कारवाईचा केवळ फार्स पहावयास मिळत आहे. परिणामी जिल्ह्यात ठिकठिकाणी अवैध रेतीसाठे आढळून येत आहे. याविरोधात मोहीम उघडून कठोर कारवाई गरजेची झाले आहे. जिल्ह्यात ३० रेती घाट आहे. अनेक रेतीमाफीया रेती चोरून त्यांची बेकायदेशीर साठेबाजी करून ठेवत असल्याचा प्रकार दिसून येत आहे. रेती घाटाच्या लिलावाची अखेर तारीख ३० सप्टेंबर असल्याचे सांगण्यात आले आहे. रेती साठवून ठेवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची संमती व परवाना घेणे बंधनकारक आहे. मात्र अवैधरीत्या रेती विकणारे रेतीमाफिया सर्रास रेतीसाठा करत आहे. जिल्ह्यातील रेतीसाठा करण्यासाठी जिल्हा खनिकर्म विभागात ९५ अर्ज आले आहेत. यात ६८ अर्ज हे नवीन आहे, तर २७ अर्ज नूतनीकरणासाठी आलेले आहे. पण जिल्हा खनिकर्म विभागामार्फत अद्याप कोणालाही रेती साठवून ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. तरीही जिल्ह्यातील ग्रामीण भागात रेती माफीयांनी अवैध रित्या रेती साठवून ठेवल्याने रेतीचे डोंगर नजरेस पडत आहेत. याबाबत संबंधीत विभागाने जुने रेतीसाठा परवाने जप्त केलेले आहे. तरीसुद्धा अवैधरीत्या रेती साठा करणे सुरूच आहे. त्यामुळे याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष तर करीत नाही ना, असा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत.(तालुका प्रतिनिधी)
मान्यता नसतानाही रेतीचे अवैध साठे
By admin | Updated: June 16, 2016 02:38 IST