इतर जिल्ह्यातही चोरी : ३.२० लाख रुपयांच्या १० दुचाकी जप्त हिंगणघाट : शहरासह आसपासच्या जिल्ह्यातून दुचाकी चोरून त्या मित्राच्या सहायाने विक्री करणाऱ्या अट्टल दुचाकी चोरट्याला त्याच्या सहकाऱ्यासह अटक करण्यात आली आहे. त्याच्याजवळून तब्बल १० दुचाकी जप्त करण्यात आल्या असून त्याची किंमत ३ लाख २० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हिंगणघाट येथे दुचाकी चोरीच्या घटना वाढत होत्या. यामुळे येथील पोलीस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने तपास सुरू केला असता सुरज उर्फ राग्या रामभाऊ वखरकर (२१) रा.माता मंदिर वॉर्ड याने या दुचाकी लंपास केल्याचे समोर आले. या माहितीवरून त्याला ताब्यात घेत विचारणा केली असता त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीच्या एकूण १० दुचाकी जप्त करण्यात आल्य आहेत. तो चोरलेल्या दुचाकी त्याचा मित्र बादल पाटील रा. येसंबा याच्या मदतीने विकत होता. यावरून पोलिसांनी बादल याच्याकडून तीन दुचाकी हस्तगत केल्या आहे. या दोन्ही आरोपितांविरोधात हिंगणघाट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुरजने हिंगणघाट, सेलू, वरोरा, चंद्रपूर, बल्लारशा, बुटीबोरी येथूनही दुचाकी लंपास केल्याचे कबुल केले. ही कारवाई ठाणेदार साळवी यांच्या मार्गदर्शनात निरंजन वरभे, अरविंद येनूरकर, ऋषिकेश घंगारे, दीपक जंगले यांनी केली.(तालुका प्रतिनिधी)
अट्टल दुचाकीचोर पोलिसांच्या जाळ्यात
By admin | Updated: January 18, 2017 00:40 IST