मोर्चा काढून धडकले आमदारांच्या निवासस्थानी : सकारात्मक चर्चेअंती आंदोलन घेतले मागेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील प्रभाग २ परिसरातील इंदिरानगर झोपडपट्टी भागातील रहिवासी सोमवारी विविध मागण्यांसाठी युवा परिवर्तन की आवाज या संघटनेच्या नेतृत्त्वात आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या निवासस्थानी धडकले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रभाग २ मधील सार्वजनिक शौचालयाच्या दुरूस्तीचे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी आमदारांना निवेदन सादर करून रेटून लावली. याप्रसंगी आमदार भोयर यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चेअंती आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.इंदिरानगरातील रहिवाशांसाठी याच भागात काही वर्षांपूर्वी सार्वजनिक शौचालय तयार करण्यात आले होते. ‘दरवाजा बंद’ या विशेष उपक्रमांतर्गत शासन हागणदारीमुक्त बाबत जनजागृती करीत प्रत्येक नागरिकांने प्रात:विधी शौचालयातच आटोपावा असा आग्रह धरत आहे. उघड्यावर शौच करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचीही तरतूद करण्यात आली असली तरी प्रभाग २ मधील सार्वजनिक शौचालयाच्या दुरूस्तीकडे लोकप्रतिनिधी व न.प. प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. तीन महिन्यांपूर्वी या शौचालयाच्या दुरूस्तीचे काम सुरू करण्याच्या उद्देशाने भूमिपुजनाचा फलक लावण्यात आला;पण प्रत्यक्षात काम न सुरू झाल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शौचालयाच्या दैनावस्थेचा सर्वाधिक त्रास महिलांना सहन करावा लागत आहे. शौचालय परिसरात घाणीने कळस गाठला असून परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. नागरिकांची समस्या लक्षात घेता तात्काळ सार्वजनिक शौचालयाच्या दुरूस्तीचे काम सूरू करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.आंदोलनात निहाल पांडे, पलाश उमाटे, गौरव वानखेडे, अभिषेक बाळबुधे, धरम शेंडे, साहिल नाडे, नरेश नाडे, अमीर खॉ पठाण, रिता ढोक, कमल ईरपाते, निता मेश्राम, मंदा पाटील, सुरेखा बावणकर, लक्ष्मी आहाके, छाया नैताम, इंदिरा शेंडे, मनिषा कोल्हे यांच्यासह युवा परिवर्तन की आवाजचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच इंदिरानगर झोपडपट्टी भागातील रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.तात्काळ काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराआमदार डॉ. पंकज भोयर यांनी प्रभाग २ मधील सार्वजनिक शौचालयाच्या दुरूस्तीकरिता १० लाखाचा निधी देण्याचे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने तीन महिन्यांपूर्वी आमदार भोयर यांच्या हस्ते भुमिपूजन करीत तसा फलकही लावण्यात आला. परंतु, अद्यापही प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली नसल्याचा आरोप करीत प्रभाग २ मधील नागरिकांच्या समस्या तात्काळ निकाली काढा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. मागणीवर येत्या काही दिवसात सकारात्मक विचार न झाल्यास युवा परिवर्तन की आवाज तीव्र आंदोलन करेल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.सार्वजनिक बांधकाम विभागात जाण्याचा दिला सल्लाआमदारांच्या निवासस्थानी आंदोलनकर्त्यांनी आमदार डॉ. पंकज भोयर यांना निवेदन दिले. यावेळी झालेल्या चर्चेत आ. भोयर यांनी दुरूस्तीचे काम लवकरच सुरू होईल असे सांगत हे काम कुठे अडकले याची अधीक माहिती जाणून घेण्यासाठी बांधकाम विभागाच्या कार्यालयात जाण्याचा सल्ला दिल्याने आंदोलनकर्त्यांनी आपला मोर्चा बांधकाम विभागाकडे वळविला.
शौचालयासाठी इंदिरानगरवासी आक्रमक
By admin | Updated: June 20, 2017 01:09 IST