वर्धा : वाहनांना रिफ्लेक्टर नसल्याने होत असलेल्या अपघाताची संख्या लक्षणीय आहे. एकूण अपघातांपैकी ७० ते ८० टक्के अपघात केवळ मानवी चुकांमुळे होत असल्याचे एका सर्वेक्षणात उघड झाले आहे. हे अपघात टाळता येणे शक्य असतानाही वाहनांना साधे रिफ्लेक्टर लावण्याकडेही दुर्लक्ष होत असल्याचे पहावयास मिळते. महामार्गावर अनेक वाहने विनारिफ्लेक्टर धावतात. यावर कारवाईची मागणी होत आहे.शहरात चौकाचौकात उभे राहणारे पोलीसही या छोट्या-छोटया गोंष्टींकडे दुर्लक्ष करीत असल्याने अपघातात वाढच होत आहे. शहरातील रस्त्यांवर व महामार्गावर अनेक जड वाहनांना पुढचे किंवा मागचे दिवे नसतात. मागे परावर्तक (रिफ्लेक्टर) नसतात. काहींच्या वाहनातील लोखंडी सळ्या किंवा वाहनातील अवजड यंत्राचा लांबुळका भाग बाहेर आलेला असतो आणि तो रात्री अगदी जवळ आल्याशिवाय मागच्या वाहनचालकाच्या लक्षात येत नाही. नियमानुसार वाहनाच्या दोन्ही बाजूंनी किंवा मोठे वाहन असल्यास चारही बाजूंनी रिफ्लेक्टर किंवा रेडियम पट्टी लावणे अत्यावश्यक आहे. पण प्रत्येक टप्प्यावर समांतर पोलीस व्यवस्थेचा खासगी कर भरल्यामुळे अशा वाहनांना कुणीच अडवत नाही. याउलट दिवसा चौकाचौकात आणि महामार्गावर उभे राहणारे पोलिसही याकडे विशेष लक्ष देत नाहीत. यामुळे टेललॅम्प बंद असलेल्या व रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनांना मागील बाजूने दुसऱ्या वाहनांने धडक देण्याच्या घटना वाढतच आहे. तज्ज्ञाच्या मते, जकात नाक्यावर किंवा शहरात चौररस्त्यावर वाहन थांबते, तेव्हा टेललॅम्प किंवा रिफ्लेक्टरची तपासणी करायची व ते बंद असतील तर तातडीने दंड आकारून ते सुरू करून देण्याची व बसविण्याची मोहीम राबविणे आवश्यक आहे, मात्र संबंधित विभाग याबाबत फारसे गंभीर नाही.प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) व वाहतूक विभाग रस्ता सुरक्षा पंधरवड्यातच वाहतुकीचे नियम पाळण्याचा आग्रह करतात. या दिवसांत रेडियम पट्टी लावण्याची मोहिमही राबविली जाते. ज्या वाहनांना ही पट्टी किंवा रिफ्लेक्टर नसतात अशा वाहनांना थांबवून ते लावतात. परंतु त्याचवेळी त्या वाहनांवर कारवाई होताना दिसून येत नाही.(प्रतिनिधी)
रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनांमुळे अपघात वाढीवर
By admin | Updated: January 17, 2015 23:05 IST