कापणीत मजूर व्यस्त : गंजी लावलेल्यांकडून हार्वेस्टर मालकांकडे धाव; काही शेतात अजूनही चिखलच वर्धा : गत आठवड्यात असलेले ढगाळी वातावरण व कोणत्याही क्षणी येणारा पाऊस यामुळे सोयाबीन उत्पादक संकटात अडकला होता. आता दोन दिवसांपासून पावसाने उघाड दिल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकडून सोयाबीन काढण्याची लगबग सुरू झाली आहे. तर ज्यांनी ढगाळी वातावरणात सोयाबीनची मळणी केली त्यांनी उन्ह निघताच सोयाबीन वाळविणे सुरू केल्याचे चित्र गावात दिसत आहे.सोयाबीन काढण्याच्या काळात पाऊस लागून पडल्याने सोयाबीन उत्पादकांनी दैना झाली होती. यातच ढगाळ वातावरणामुळे झाडावरच शेंगाना अंकूर फुटले होते. यामुळे हाती आलेले उत्पादन हातचे जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. सतत येत असलेल्या पावसामुळे जमिनी ओल्या असल्याने शेतात थ्रेशर जात नसल्याने मळणी खोळंबली होती. पाऊस सुरू असताना उघाड मिळालेल्या दिवसात जसे जमेल तसे सोयाबीन काढून शेतकऱ्यांनी घरी नेण्याचा सपाटा सुरू केला होता. यात सोयाबीन ओले असल्याने त्याची ढेप होण्याची वेळ आली होती. शिवाय सोयाबीन ओले असल्याने त्याला बाजारात भाव मिळणे कठीण झाले होते. यामुळे आता उघाड मिळताच काढलेले सोयाबीन उन्हात वाळविण्यात शेतकरी व्यस्त आहे, तर ज्यांच्या शेतात सोयाबीन कापनी होणे बाकी आहे त्यांनी ते कापणे सुरू केले आहे. (प्रतिनिधी) वेळी अवेळी येणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांवर मजुरीचा भुर्दंडगत आठवड्यात ढगाळी वातावरणामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेले सोयाबील काढून त्याची गंजी लावण्याचे काम सुरू केले होते. यात सोयाबीन कापताना मध्येच येत असलेल्या पावसामुळे कामाचा खोळंबा झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. कापणी करून सोयाबीनची गंजी लावून ते वाळण्याची प्रतीक्षा अनेक शेतकऱ्यांना होती. मात्र पाऊस येत असल्याने कापलेले सोयाबीन ओले होण्याची भीती शेतकऱ्यांना असल्याने त्यांच्याकडून ती झाकण्याचे काम झाले. उघाड येताच झाकलेली गंजी पुन्हा उघडण्याचा उप्रकम गत आठवड्यात शेतकऱ्यांचा असल्याचे दिसून आले.
उघाड मिळताच सोयाबीन उत्पादकांची लगबग
By admin | Updated: October 14, 2016 02:38 IST