नगर पालिका निवडणूक : नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदाकरिता अनेकांच्या अपेक्षा वर्धा : जिल्ह्यातील सहाही पालिकेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाची निवडणूक २७ नोव्हेंबर रोजी होऊ घातली आहे. या निवडणुकीकरिता दाखल नामांकन अर्जांची छाणनी प्रक्रिया बुधवारी पार पडली. यात शनिवारपर्यंत जिल्ह्यातील सहा पालिकांच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी एकूण १००१ अर्ज आले होते. बुधवारी छाणनीनंतर ९७१ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. यात नगराध्यक्ष पदाचे ९६ पैकी सात अर्ज अवैध ठरल्याने ८९ तर नगर सेवक पदाकरिता ९०५ पैकी २७ अर्ज अवैध ठरल्याने ८७८ उमेदवार रिंगणात आहे. ११ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार असून १२ नोव्हेंबर रोजी चिन्हवाटप करण्यात येणार आहे. सहा नगराध्यक्षांकरिता जिल्ह्यात एकूण ९६ नामांकन दाखल झाले होते. यात वर्धा नगराध्यक्षाकरिता ३१ नामांकन अर्ज दाखल झाले होते. बुधवारी छाणनी प्रक्रिया पार पडल्यानंतर निरज गुजर व पंकज सराफ हे दोन अर्ज अवैध ठरविण्यात आले. यामुळे २९ उमेदवार रिंगणात शिल्लक राहिले आहेत. वर्धेत नगरसेवक पदाकरिता २३४ नामांकन अर्ज दाखल केले होते. यातील चार अर्ज अवैध ठरविण्यात आले असून २३० नामांकन शिल्लक राहिले आहेत. जातवैधता प्रमाणपत्र नसल्याने, शपथपत्रावर स्वाक्षरी नसणे, अनामत रक्कम न भरल्याने हे अर्ज रद्द करण्यात आले. जयंत धांदे, नैना महाजन, राणी हेडाऊ व रजनी मसराम यांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. छाणनी प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी उपविभागीय अधिकारी घनश्याम भूगावकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मुख्याधिकारी अश्निनी वाघमळे व नायब तहसीलदार डी.एस. राऊत यांनी कर्मचाऱ्यांच्या साह्याने पार पाडली.(कार्यालय प्रतिनिधी) आक्षेपामुळे हिंगणघाटची प्रक्रिया रखडली हिंगणघाट : हिंगणघाट नगर परिषदेमध्ये छाणनीदरम्यान रद्द झालेल्या नामांकन अर्जाबाबत आक्षेप नोंदविण्यात आलेत. यामुळे एकूण छाणनी प्रक्रियाच रखडली. परिणामी, रात्री उशिरापर्यंत नगराध्यक्ष व नगर सेवक पदाचे किती अर्ज अवैध ठरविण्यात आले आणि किती अर्ज शिल्लक राहिले, हे कळू शकत नव्हते. छाणनी प्रक्रियेवर घेतलेल्या आक्षेपांमुळे रात्री ८ वाजेपर्यंत प्रक्रिया सुरूच होती. हिंगणघाट पालिकेत नगराध्यक्ष पदाकरिता २१ तर नगरसेवक पदांकरिता २८१ नामांकन दाखल झाले होते. यातील नगराध्यक्ष पदाचा एक अर्ज अवैध ठरविण्यात आल्याने २० नामांकन शिल्लक राहिले आहेत. गजानन माऊस्कर या अपक्ष उमेदवाराचा अर्ज रद्द झाला. नगर सेवक पदाचे तीन नामांकन अर्ज अवैध ठरविण्यात आले. यामुळे आता २७७ नामांकन शिल्लक राहिले आहेत. नामांकन अर्ज परत घेतल्यानंतर निवडणूक रिंगणात किती दिग्गज आहेत, हे समोर येणार असून प्रचाराची रणधुमाळी माजणार आहे. नगराध्यक्षपदाचे दोन तर नगरसेवकपदाचे आठ नामांकन रद्द पुलगाव : स्थानिक नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी १७ तर नगरसेवक पदासाठी ११७, असे १३४ नामांकन अर्ज दाखल करण्यात आले होते. या अर्जांची बुधवारी छाणनी पार पडली. यात नगराध्यक्ष पदाचे दोन तर नगर सेवक पदाचे आठ अर्ज रद्द ठरविण्यात आले. पक्षाचे एबी फॉर्म व सूचक नसल्याने हे अर्ज अवैध ठरविण्यात आलेत. बुधवारी सकाळी कार्यालय सुरू झाल्यापासून सर्व राजकीय पक्ष व अपक्ष उमेदवारांनी छाणनी प्रक्रियेसाठी गर्दी केली होती. नगराध्यक्ष पदापैकी दोन अर्ज रद्द झाल्याने १५ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. नगरसेवक पदाचे आठ अर्ज रद्द झाल्यानंतर रिंगणात १०९ उमेदवार राहिले आहेत. निवडणूक अधिकारी म्हणून राजकुमारी शाह, मुख्याधिकारी डॉ. मेघना वासनकर, नायब तहसीलदार राठोड इत्यादिनी नामांकनपत्र स्विकारले.(तालुका प्रतिनिधी) नगराध्यक्षाचा एक तर नरसेवकांचे चार अर्ज रद्द आर्वी : स्थानिक पालिकेत नगराध्यक्ष पदाकरिता आठ तर नगरसेवक पदाकरिता १०४ नामांकन अर्ज दाखल झाले होते. बुधवारी छाणनीमध्ये नगराध्यक्ष पदाचा शिवसेनेच्या डॉ. मंजूषा अग्रवाल यांचा अर्ज रद्द करण्यात आल्याने ७ अर्ज शिल्लक राहिले. नगरसेवक पदाकरिता आलेल्या १०४ पैकी चार नामांकन अर्ज रद्द झाले. यामुळे १०० अर्ज शिल्लक राहिले आहेत.(तालुका प्रतिनिधी) नगरसेवकांचे तीन अर्ज अवैध देवळी : नगर परिषदेच्या नगरसेवक पदासाठी दाखल करण्यात आलेल्या नामांकनापैकी तीन उमेदवारांचे नामांकन अवैध ठरविण्यात आले. कागदपत्रातील त्रूटीमुळे हे नामांकन रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यात प्रभाग क्र. २ मधील कुसूम खोटे, प्रभाग ५ मधील नरहरी कामडी व प्रभाग ६ मधील किशोर देशकर यांच्या अर्जांचा समावेश आहे. यामुळे आता छाणनी प्रक्रियेनंतर नगराध्यक्ष पदासाठी ४ तर नगरसेवक पदासाठी ६९ अर्ज शिल्लक राहिले आहेत. रद्द करण्यात आलेले तीनही नामांकन अपक्ष उमेदवारांचे आहे.(प्रतिनिधी) नगराध्यक्षाचा एक तर नगरसेवकपदाचे पाच अर्ज रद्द सिंदी (रेल्वे) : राजकीय दृष्ट्या चर्चेत असलेल्या सिंदी (रेल्वे) पालिकेत नगराध्यक्षपदाकरिता १० नामांकन आले होते. यातील एक अर्ज रद्द ठरल्यने ९ उमेदवार रिंगणात आहेत. नगरसेवक पदाकरिता ९५ नामांकन दाखल झाले होते. यातील पाच अर्ज रद्द ठरले. यामुळे ९० उमेदवार शिल्लक आहेत. नामांकन परत घेण्याच्या दिवशी खरे चेहरे समोर येतील.(प्रतिनिधी)
सहा पालिकांत ३४ नामांकन ठरले अवैध
By admin | Updated: November 3, 2016 02:57 IST