सेवाग्राम : कस्तुरबा गांधी यांची ७१ वी पुण्यतिथी रविवारी सेवाग्राम आश्रमात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित अतिथींनी कस्तुरबा गांधी यांचे विचार महिलांकरिता प्रेरणादायी व दिशादर्शक असल्याचे विचार व्यक्त केले. शिवाय यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होेते. यात सकाळी सुतकताई, प्रभात फेरी व सायंकाळी प्रार्थना आदी कार्यक्रम झाले.कार्यक्रमाला गांधी शांती प्रतिष्ठानच्या अध्यक्ष राधाबहन भट्ट व गोपाळकृष्ण गोखले यांचे पणतू सुनील गोखले यांची उपस्थिती होती. यावेळी विचार व्यक्त करताना भट्ट यांनी कस्तुरबा गांधी यांच्या कार्याची माहिती दिली. त्यांच्या कार्याची माहिती देताना त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील प्रसंग सांगितला. त्यांनी चर्च मधील विवाहालाच कायद्याने मान्यता असल्याच्या ब्रिटीश सरकारच्या धोरणा विरोधात बापूजवळ हिंमत व्यक्त केल्याचे सांगितले. त्यांची हिच हिंमत महिलांना दिशादर्शक ठरत असल्याचे विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले. आठवणी सांगताना त्यांनी महात्मा गांधींनी कस्तुरबा यांना ‘तुझा तुरुंगात मृत्यू झाला तर जगदंबा म्हणून पुजा करील’, असे म्हटले होते. योगायोगाने कस्तुरबांचा पुण्याच्या बंदीवासातच मृत्यू झाला. आज समाजात वेळ मिळत नसल्याचे बोलले जाते. संयुक्त कुटुंब नाही. यामुळेच प्रेम, आपुलकी, संस्कार मिळत नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाचा प्रारंभ ‘हे प्रभु सुनलो’ व ‘माझे वंदन तुझ आई’ या गीतांनी झाली. ‘पायोजी मैने राम रतन धन पायो’ या गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला. कस्तुरबा गांधी यांच्या स्मृतिदिनी पहाटे घंटी घर ते बा कुटी अशी प्रभात फेरी काढण्यात आली. प्रार्थना भूमिवर सर्वधर्म प्रार्थना झाल्यानंतर श्रमदान करण्यात आले. सायंकाळी ५.३० ते ६ वाजेपर्यंत सुत्रयज्ञ होवून सायंकाळी प्रार्थना झाली. कार्यक्रमाला सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही, आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर, नई तालीम समितीचे अध्यक्ष डॉ. सुगन बरंठ, महादेव व डॉ. भरत महोदय व्यास उपस्थित होते. अतिथींचा शाल व सूतमाळ देत स्वागत करण्यात आले. संचालन मालती यांनी केले तर आभार मंत्री प्रा. डॉ. श्रीराम जाधव यांनी मानले. यावेळी हिराभाई, बाबाराव खैरकर, अशोक गिरी, नामदेव ढोले, सिद्धेश्वर, डॉ. शिवचरण ठाकुर, हुसैनभाई, प्रशांत गुजर, शंकर बंगडे, अरूण लेले, प्रशांत ताकसांडे, आकाश लोखंडे, डॉ. सोहम पंड्या, विनायक ताकसांडे, कुसूम पांडे, देविका चव्हाण, रोशना जामलेकर, शोभा, महिला आश्रम अध्यापक विद्यालयाच्या तसेच राधिकाबाई मेघे नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कार्यकर्ता व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.(वार्ताहर)
‘बां’चे विचार व कार्य महिलांकरिता दिशादर्शक
By admin | Updated: February 23, 2015 01:45 IST