लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना संकटाच्या काळात वर्धेकरांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय तर सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या कोविड युनिटमधील ऑक्सिजन आणि आयसीयू बेड फुल्ल झाल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. हळूहळू का हाेई ना पण जिल्ह्याची कोविड परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने आतातरी गाफील वर्धेकरांनी दक्ष राहून जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे गरजेचेच आहे.सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयातील कोविड युनिटमधील आयसीयू विभागात २० रुग्णखाटा आहेत. त्यापैकी तब्बल १९ खाटांवर सध्या कोविड बाधित उपचार घेत असून केवळ एकच रुग्णखाट शिल्लक आहे. तसेच ऑक्सिजनच्या एकूण १८५ रुग्णखाटा असून या सर्वच रुग्णखाटांवर सध्या ॲक्टिव्ह कोविड बाधित असून त्यांना चांगला उपचार देण्यासाठी कस्तुरबातील डॉक्टर व आरोग्य कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. तर सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील काेविड युनिटमधील आयसीयू विभागात एकूण ३१ रुग्णखाटा आहेत. यापैकी ३० रुग्णखाटांवर कोविड बाधित असून केवळ एकच बेड रिक्त आहे. तर याच रुग्णालयातील कोविड युनिटमध्ये एकूण ३२० ऑक्सिजन बेड असून तब्बल ३१८ खाटांवर रुग्ण असून केवळ दोन रुग्णखाटा रिक्त आहेत. वर्धेकरांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या या दोन्ही हॉस्पिटलमधील रुग्णखाटा झपाट्याने फुल्ल होत असल्याने जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य विभागाने वेळीच योग्य पाऊल उचलून पर्यायी व्यवस्था उभी करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे जिल्हा रुग्णालयाने पाच व्हेंटिलेटर नुकतेच सेवाग्राम येथील रुग्णालयाला दिले आहे.
केवळ शासकीय रुग्णालयातच ऑक्सिजनच्या रुग्णखाटा उपलब्धजिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड युनिटमध्ये एकूण १०० ऑक्सिजन बेड आहेत. त्यापैकी १९ खाटांवर ॲक्टिव्ह कोविड बाधित उपचार घेत असून उर्वरित ८१ खाटा रिक्त आहे. तर आर्वी आणि हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयात अनुक्रमे ३० आणि ६० ऑक्सिजन बेड असून ते पूर्णपणे रिकामे आहेत.
अन्यथा स्मशानशेडही पडणार अपुरेवर्धा जिल्ह्यात कोविडचा प्रसार झपाट्याने होत आहे. इतकेच नव्हे तर सेवाग्राम आणि सावंगी येथील रुग्णालयातील आयसीयू आणि ऑक्सिजन बेड फुल्ल झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर वेळीच पर्यायी व्यवस्था न उभी केल्यास वर्धा जिल्ह्यातील कोविड मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी वर्धेतील वैकुंठधामातील आरक्षित केलेले स्मशानशेडही अपुरे पडण्याची शक्यता आहे.