नारायणपूर येथील घटना : कारागृहात काढलेले दिवस शिक्षेतून कमीवर्धा : पती घरीच राहतो, तो कामाला जात नाही असे म्हणत पत्नीने त्याच्या अंगावर रॉकेल टाकून त्याला जाळले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याचे नाव रवींद्र नक्षीने रा. नारायणपूर असे आहे. या प्रकरणात पत्नी योगिता रवींद्र नक्षिणे हिला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. हा निकाल अती सत्र न्यायाधीश एम. आर. पुरवार यांनी मंगळवारी दिला. हकीकत अशी की, १५ फेब्रुवारी २०१४ रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात रात्री एका इसमाला जळालेल्या अवस्थेत दाखल केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याचे नाव रवींद्र नक्षिणे असे असल्याचे सांगण्यात आले. पोलीस कर्मचारी विनोद केने यांनी रवींद्रचे बयाण नोंदविले. त्याने पत्नी योगिता हिने तो कामाला जात नाही असे म्हणत अंगावर रॉकेल टाकून जाळल्याचे सांगितले. यात उपचारादम्यान त्याचा मृत्यू झाला. तो नारायणपूर येथील असल्याने प्रकरण समुद्रपूर पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी तपास पूर्ण करून योगिता नक्षिणे (२२) हिच्या विरूद्ध कलम ३०२ भादंवि अन्वये न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले.प्रकरण न्यायाधीश एम.आर. पुरवार यांच्या न्यायालयात साक्षी पुराव्याकरिता आले. शासनातर्फे अॅड. श्याम दुबे यांनी एकूण नऊ साक्षदाराची साक्ष नोंदविली. साक्ष व पुराव्यावरून न्यायाधीशांनी योगिता रवींद्र नक्षीणे हिला भादंवि कलम ३०२ अन्वये आजन्म कारावास व ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने कारावासाची शिक्षा ठोठावली. आरोपी १८ फेब्रुवारी २०१४ पासून कैदेत असल्यामुळे तितक्या कालावधीची माफी एकूण शिक्षेतून देण्यात आली. सहायक शासकीय अभियोक्ता श्याम दुबे यांना अॅड. रूची तिवारी, अॅड. प्रणाली आगलावे व यांनी सहकार्य केले.(प्रतिनिधी)
पतीची जाळून हत्या; पत्नीला जन्मठेप
By admin | Updated: March 2, 2016 02:30 IST