सेवाग्राम : विविध आजारांवर औषधी उपयोगी व कल्पवृक्ष म्हणून ओळख असलेल्या कडुनिंबाच्या झाडावर मानवीय संकट निर्माण झाले आहे. साल काढण्याच्या पद्धतीमुळे झाड नामशेष तर होणार नाही ना, अशी भीती वृक्षमित्र व्यक्त करीत आहे.खरांगणा (गोडे) मार्गावर आणि आरामशिनजवळ कडुनिंबाचे मोठे झाड आहे. या झाडाची चहूबाजूंनी साल काढण्यात आली आहे. परंपरागत ताप व अन्य आजारांत कडुनिंबाच्या ‘साल’चा काढा पिण्याची पद्धत आहे. यामुळेच साल काढून झाडांना मरणाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे. कडुनिंबाचे झाड औषधी गुणधर्मयुक्त असून पानांत कीडनाशक घटक आहे. निंबोळ्या पक्ष्यांचे खाद्य असून त्यापासून साबन व खते तयार होतात. सालीपासून काढा, लेप तयार होतो. उन्हाळ्यात या झाडाखाली शितलता प्राप्त होते. बुंध्याजवळची माती आरोग्य संवर्धन करणारी आणि शरीरातील दाह कमी करण्याचे काम करीत असते. गत काही वर्षांपासून नागरिकांनी या झाडाला लक्ष्य करून पाने, साल, माती आदींचा वापर सर्रास सुरू केल्याने सेवाग्राम-वर्धा, वर्धा-नागपूर, सेवाग्राम ते खरांगणा गोडे या मार्गावरील असंख्य झाडे मृतपाय झाली आहेत. उर्वरित अखेरच्या घटका मोजत असताना दिसते. कडुनिंबाची झाडे देशी असून या झाडांचे संवर्धन काळाची गरज आहे; पण या झाडांची लागवड कठीण झाल्याने संवर्धनाचा प्रश्न बिकट झाला आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.(वार्ताहर)
कडुनिंबाच्या झाडावर मानवीय संकट
By admin | Updated: January 3, 2016 02:48 IST