खरडीपुरा येथील घटना : कापसासह साहित्याचा कोळसा कारंजा (घाडगे): घरी कुणी नसताना अचानक लागलेल्या आगीत घरातील शेती साहित्यासह कापूस व इतर जीवनावश्यक वस्तूचा कोळसा झाला. यात ५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी २.३० वाजता खरडीपुरा येथील देवमन बारकू पाटील यांच्या घरी घडली. या आगीचे कारण मात्र अद्याप कळू शलिे नाही.आगीची माहिती परिसरातील नागरिकांना मिळताच त्यांनी मिळेल त्या साहित्याचा वापर करून ती विझविण्याचा प्रयत्न केला. आगीवर ताबा मिळेपर्यंत घरातील साहित्याचा कोळसा झाला होता. येथील तलाठी पी. आर. ताकसांडे यांनी घटनेचा पंचनामा केला असून अहवाल वरिष्ठांकडे सादर केल्याची माहिती आहे. या शेतकऱ्याला शासनाच्यावतीने मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, खर्डीपूरा येथील शेतकरी देवमन पाटील यांच्या घरी कुणीचे नव्हते. ते घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. याच काळात दुपारी २.३० वाजताच्या सुमारास पाटील यांच्या घरातून धूर निघत असल्याचे गावकऱ्यांच्या नजरेत पडले. त्यांनी याची माहिती पाटील यांना दिली. पाटील परिवारातील नागरिक घरी पोहोचेपर्यंत परिसरातील नागरिकांनी मिळेल त्या साहित्याने आगीवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला. आग आटोक्यात येईपर्यंत मात्र घरातील साहित्याचा कोळसा झाला होता. या आगीत शेतीपयोगी साहित्यासह घरातील अन्न धान्य व शेतीचे उत्पन्न आगीच्या भक्ष्यस्थानी आले. तलाठी ताकसांडे यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठत पाहणी केली. त्यांनी घटनेचा पंचनामा करून त्याचा अहवाल तयार केला असून वरिष्ठांना देण्यात येणार असल्याचे सांगितले. या शेतकऱ्याला शासनाच्यावतीने मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.(शहर प्रतिनिधी) नगरपंचायत झाली पण सुविधांचा अभाव कारंजा नव्याने नगर पंचायत झाली. मात्र सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत. गावात आग लागल्यास त्यावर आळा मिळविण्याकरिता कुठलीही अग्निशमन यंत्रणा नाही. दुपारची वेळ होती. सुर्दैवाने परिसरात नागरिक उपस्थित असल्याने त्यांनी आगीवर ताबा मिळविला. जर यावेळी परिसरात नागरिक नसते तर येथे मोठी घटना घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पिंपळगाव येथे गोठ्याला आग; दोन लाखांचे नुकसानगिरड- पिंपळगाव येथे शॉट सर्कीटमुळे गोठ्याला आग लागली. यात दोन ते २.५० लाख रुपयांचे नुकसन झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यात धनराज मून यांच्या गोठ्यातील स्प्रिंकलर, पाईप, ठिबक पाईप व अन्य शेतीपयोगी साहित्य तर पंचम मून यांचे ५० हजार रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. अशोक तेलंग याचे घराचे वायर शॉट होऊन ५ हजार रुपयांचे नुकसान झाले. ही आग बुधवारी रात्री लागली. आग मुन यांच्या निदर्शनास आली असता त्यांनी आरडा ओरड केला. यात गावकऱ्यांच्या मदतीने आग विझविली. या आगीत शेतकऱ्यांचे शेती उपयोगी साहित्य जळाल्याने तो अडचणीत आल्यामुळे त्याला शासकीय मदत मिळावी अशी मागणी होत आहे. या घटनेचा पंचनामा पटवारी खैरकर, जमादार विनोद भांडे यांनी केला असून पुढील तपास सुरू आहे.
घराला आग; पाच लाखांचे नुकसान
By admin | Updated: January 16, 2016 02:27 IST