कारंजा (घा़) : स्थानिक ग्रामीण रुग्णालयाद्वारे तालुक्यातील रुग्णांचे आरोग्य सांभाळले जाते; पण सध्या येथील रुग्णसेवा कोलमडली आहे़ एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर रुग्णालयातील आरोग्यसेवा अवलंबून आहे़ गत अनेक दिवसांपासून एकच वैद्यकीय अधीक्षक कार्यरत आहे़ ग्रामीण रुग्णालयाला १० वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर असताना एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे़ ९ पदे रिक्त असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे़ वेळीच उपचार मिळत नसल्याने रुग्णांना प्राण गमवावे लागत आहेत़ कारंजा हे तालुक्याचे ठिकाण असून परिसरातील ९० खेड्यातील नागरिक या ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता येतात़ शिवाय महामार्ग क्र. ६ असल्याने ३० किमीच्या आसपास अपघात घडल्यास येथील एकमेव ग्रामीण रुग्णालयाशिवाय अन्य सुविधा उपलब्ध नाही़ रात्री -अपरात्री अपघात घडतात़ तेव्हा प्राथमिक उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालयातच अपघातग्रस्तांना दाखल करावे लागते़ एकच वैद्यकीय अधिकारी असल्याने इतारांची उणीव जाणवते़ ग्रामीण रुग्णालयात एकूण १० मंजूर पदांपैकी ५ पदे ट्रामाची रिक्त आहेत़ एक पद एन.सी.डी. (डायबीटीज, शुगर, बिपी) चे रिक्त आहे तर ग्रामीण रुग्णालयाची तीन पदे, अशी एकूण ९ पदे रिक्त आहेत़ ही पदे रिक्त असल्याने रुग्णांना योग्य आरोग्य सेवा मिळत असेल काय, हा प्रश्नच आहे. लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देण्यास असमर्थ दिसतात़ मोठा अपघात वा घटना घडली की तात्पूरता जाग येतो, अन्यथा पाठपुरावाही होतो की नाही, हा प्रश्नच आहे. हा संपूर्ण प्रकार रुग्णांच्या जीवावर बेतत असल्याची अनेक उदाहरणे आहेत़ अतिमहत्त्वाच्या सेवेत मोडल्या जात असलेल्या आरोग्य सेवेचेच सध्या धिंडवडे निघत असल्याचे दिसते़ आरोग्य समितीही याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे़ ट्रामाकेअरची इमारत तयार होऊन दहा वर्षांचा काळ लोटला; पण सुविधा नाहीत़ ग्रामीण रुग्णालयाची सुसज्ज इमारतही तयार होत आहे; पण रिक्त पदांच्या ग्रहणामुळे नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवेपासून वंचित राहावे लागत आहे. आरोग्य यंत्रणेचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते़ गत कित्येक दिवसांपासून पदभरतीही होत नसल्याने रुग्णसेवा कोलमडली आहे़ आरोग्य विभागाने याकडे लक्ष देत रुग्णसेवेत सुधारणा करावी, अशी मागणी होत आहे़(शहर प्रतिनिधी)
एकाच डॉक्टरवर रुग्णालयाचा भार
By admin | Updated: November 4, 2014 22:45 IST