जिल्हा कचेरीसमोर शिक्षक समितीचे आंदोलन वर्धा : असर २०१४ च्या अहवालातून प्रथम संस्थेने ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणासंबंधी काढलेले निष्कर्ष तर्कसंगत नसून जिल्हा परिषदांच्या शाळा व शिक्षकांची बदनामी करणारे आहेत. शोषित व वंचितांच्या शाळांचे खासगीकरण करण्याच्या षडयंत्राचा हा एक भाग आहे, असे म्हणत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने असर-२०१४ च्या अहवालाची शनिवारी जिल्हाकचेरीसमोर होळी करण्यात आली.ग्रामीण भागातील जिल्हा परिषदांच्या शाळा खासगी शिक्षणमाफियांच्या ताब्यात देण्याकरिता प्रथम स्वयंसेवी संस्था काटकारस्थान रचत आहे. १३ जानेवारी रोजी केंद्र शासनाला सादर केलेल्या दहाव्या असर अहवालातून जाणीवपूर्वक जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांची बदनामी केली आहे. असर अहवालातून मांडलेले निष्कर्ष अस्वीकार्य असल्याचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने निवेदनात म्हटले आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील शिक्षणाचे चित्र अत्यंत विकृतपणे रंगविले जात आहे. असर अहवालाला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती नाकारत असून या अहवालातील निष्कर्ष खोटे असल्याने प्रथम संस्थेने शिक्षक समितीचे आवाहन स्वीकारून नव्याने सर्वेक्षण करावे आणि त्यात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीसह शिक्षण विभागातील पर्यवेक्षीय यंत्रणा, पत्रकार, लोकप्रतिनिधी यांना सोबत घ्यावे, अशा सूचना शिक्षक समितीने प्रथम संस्थेला केले आहे. प्रथम संस्थेने तयार केलेला ‘असर २०१४’ अहवाल शिक्षकांची बदनामी करणारा असल्याचा समितीचा आरोप आहे. याबाबत जागृती करणे आणि प्रथम संस्थेचा निषेध करून ‘असर २०१४’ अहवालाची शनिवारी होळी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात शिक्षक समितीचे विजय कोंबे, नरेश गेडे, नरेंद्र गाडेकर, महेंद्र भुते, प्रकाश काळे यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले. यावेळी समितीच्यावतीने शिक्षण मंत्र्यांना देण्याकरिता एक निवदेन जिल्हाधिकारी यांच्या स्वाधीन करण्यात आले.(प्रतिनिधी)
‘असर २०१४’ ची होळी
By admin | Updated: January 17, 2015 23:02 IST