लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : सोमवारी झालेल्या मुसळधार पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानाचा मोबदला मिळावा या मागणीसाठी संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांनी हेटीकुंडी फाट्यावर सुमारे तीन तास महामार्ग रोखून धरला. नुकसानाचा १०० टक्के मोबदला देण्याची मागणी करीत संत्रा महामार्गावर आणला. याप्रसंगी आ. अमर काळे यांनी एक महिन्यात नुकसान भरपाई न मिळाल्यास पुन्हा आंदोलन करू, असे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.याप्रसंगी आ. काळे, अमरावतीचे खा. आनंदराव अडसुळे उपस्थित होते. आ. काळे, माजी आमदार दादाराव केचे, जि.प. सदस्य सरिता गाखरे, मुकूंद बारंगे यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त सावली, हेटीकुंडी भागाचा दौरा केला. रस्तारोको आंदोलनामुळे तीन किमीपर्यंत वाहतूक खोळंबली होती. सोमवारी झालेल्या गारपिटीमुळे ठाणेगाव, सावली (खुर्द), हेटीकुंडी, आगरगाव, बोरी, धर्ती व परिसरात शेतकऱ्यांच्या संत्रा, गहू, चणा, भाजीपाला पिकांचे हजारो हेक्टरमधील कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. गारा इतक्या मोठ्या होत्या की, आज सकाळपर्यंत वितळल्या नव्हत्या. गारपिटीमुळे सावली येथील शेतकरी गणपत मुन्ने, महादेव देवासे, किशोर पेंधे, शीला पेंधे, पुरूषोत्तम गायकवाड हे गंभीर जखमी झाले. त्यांना कारंजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सावली येथील शेतकऱ्यांचे गहू, चणा असे कोणतेही पीक राहिले नाही. हेटीकुंडी येथील केशव भक्ते, निलीमा गोहते, अशोक गोहते, धनराज गोहते यासह अनेक शेतकऱ्यांचे संत्राचे पीक जमिनदोस्त झाले. भक्ते यांचा बगिचा सोमवारी दुपारी ४५ लाख रुपयांना मागितला होता; पण गारपिटीनंतर मंगळवारी झाडांना फळेच नव्हती. जनावरांचा चारा पूर्णत: नष्ट झाला. या नुकसानीचा निश्चित आकडा कळला नसला तरी कोट्यवधी रुपयांचे नुकसान असल्याचे बोलले जात आहे. सावली येथील अनेक घरांवरील कवेलू फुटलेत. तहसीलदार सचिन कुमावत ताफ्यासह नुकसानग्रस्त भागाचा दौरा करीत आहेत.
नुकसानग्रस्त शेतकरी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 22:43 IST
सोमवारी झालेल्या मुसळधार पाऊस व गारपिटीमुळे शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानाचा मोबदला मिळावा या मागणीसाठी संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांनी हेटीकुंडी फाट्यावर सुमारे तीन तास महामार्ग रोखून धरला.
नुकसानग्रस्त शेतकरी रस्त्यावर
ठळक मुद्देहेटीकुंडी फाट्यावर तीन तास रोखून धरला महामार्ग फळबागा उद्ध्वस्त, शेतकरीही जखमी