तहसीलदारांना निवेदन : समुद्रपूर ब्लॉक काँग्रेस समितीची मागणी समुद्रपूर : हळदगाव ते महामार्गापर्यंतचा जोडरस्ता अत्यंत खराब झाला आहे. त्यामुळे वहिवाटीस अडथळा निर्माण झाला आहे. तातडीने या रस्त्याची दुरूस्ती करावी अशी मागणी समुद्रपूर ब्लॉक काँग्रेस समितीच्यावतीने तहसीलदारांना निवेदनातून करण्यात आली. मांडगाव जिल्हा परिषद सर्कलमधील हळदगाव ते महामार्ग जोडरस्ता कमालीचा उखडला आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत आहेत. अनेक वर्षापासून या रस्त्याची दुरूस्ती करण्यात न आल्याने रस्त्याची पुरती दुरवस्था झाली आहे. या रस्त्याने रहदारी करणेही धोकादायक झाले आहे. सध्या पावसाचे दिवस आहे. खड्ड्यांत पाणी साचून राहत असल्याने सर्वत्र चिख साचत आहे. यावरून वाहने चालविताना सातत्याने अपघाताचा धोका वाढला आहे. रस्त्यावरील पाणी वाहून जाण्याची कुठलीही व्यवस्था नाही. या रस्त्याने हळदगाव, शिवणी, मजरा, सेवा या गावातील विद्यार्थ्यांसह नागरिक नियमित ये जा करीत असतात. रस्त्याच्या दुरवस्थेने प्रवाश्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येकडे लोकप्रतिनिधींनीही दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. निवेदन देताना काँग्रेस समितीचे जिल्हा सचिव विनोद हिवंज, अनिरूद्ध मुंजेवार, प्रवीण पणत, दत्ता खेकरे, गितेश शेंडे, शशांक फुसाटे, निखिल कांबळे, संकेत फुसाटे, आकाश आत्राम, फैयाज पठाण, मंगेश आत्राम, अजय जवादे, कुणाल मुंजेवार, तेजरत किटे, संतोष पवार, शुभम फुसाटे, नितीन उईके, अंकुश मडावी आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)
हळदगाव-महामार्ग जोडरस्त्याची दैना
By admin | Updated: August 11, 2016 00:38 IST