बाजारात सोयाबीनची आवक वाढली : व्यापाऱ्यांकडून दर पाडण्याची शक्यता; बळीराजा चिंतेतवर्धा : दिवाळसण तोंडावर आहे. यामुळे शेतकऱ्यांनी शेतातून आलेले सोयाबीन बाजारात आणणे सुरू केले आहे. परिणामी बाजारात आवक वाढली आहे. आवक वाढताच आता भाव गडगडण्याचे संकेत मिळत आहे. यामुळे व्यापाऱ्यांकडून हमीभावापेक्षा कमी दरात सोयाबीन विकण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांना वाढीव दरापेक्षा शासनाने जाहीर केलेल्या हमीभावावरच समाधान मानावे लागणार असल्याचे चित्र बाजारात आहे. शेतकऱ्यांचे सोयाबीन निघाले त्या काळात ३ हजार ५०० रुपयांचा दर देण्यात आला होता. हा दर कायम राहील असे वाटत असताना त्यात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती असलेल्या हिंगणघाट येथील बाजारात सोयाबीनला २ हजार ८०० रुपयांचा दर मिळत आहे. वर्धेतही शेतकऱ्यांना तोच दर दिल्या जात आहे. प्रारंभी मिळालेल्या दरामुळे शेतकऱ्यांनी आपले उत्पन्न बाजारात आणणे सुरू केले. बाजारील दरामुळे शेतकऱ्यांनी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला होता; मात्र पडलेल्या दरामुळे त्यांना त्यांची इच्छा जागीच विसरावी लागत आहे. यंदाही शेतकऱ्यांचा शेतमाल येताच दर पडण्याचा अलिखित नियम कायम असल्याचे दिसून आले. बाजारात सोयाबीन आणताच व्यापाऱ्यांकडून तो ओला आहे, त्यात कचरा आहे, असे म्हणत अत्यल्प दरात त्याची बोली लावण्यात येत आहे. यामुळे त्याला दर मिळेल अथवा नाही, अशी त्यांची मनस्थिती येथे होत असल्याचे दिसते. यातच काही व्यापारी नगदी चुकाऱ्याची लालूस देत हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी करण्याचा प्रयत्न करीत आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत असून व्यापाऱ्यांकडून त्यांची लूट करण्यात येत आहे. शासनाच्यावतीने शेतकऱ्यांची लूट होवू नये म्हणून हमीभाव जाहीर केला आहे. हा हमीभाव शेतकऱ्यांना परवडणारा नसला तरी निदान त्याची लूट होण्याच्या प्रकारामुळे याला ब्रेक मिळण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात सध्या तरी हमीभावावरच समाधान मानावे लागणार असल्याची स्थिती आहे. उजेडाच्या सणाकरिता घरातील सोयाबीन विकूण मुला- बाळांची दिवाळी साजरी करण्याची इच्छा बाळगणाऱ्या शेतकऱ्यांना आलेल्या चुकाऱ्यात काय करावे असा प्रश्न भेडसावत आहे. यामुळे त्याची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता बळावली आहे.(प्रतिनिधी)
शेतकऱ्यांना हमीभावाचाच आधार
By admin | Updated: October 26, 2016 00:54 IST