लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे आयोजित महाराष्ट्र गट ‘क’ सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२२ रविवारी जिल्ह्यातील नऊ केंद्रांवरून शांततेत पार पडली असली, तरी या परीक्षेला तब्बल ५५१ परीक्षार्थ्यांनीच दांडी मारल्याचे वास्तव आहे. ही परीक्षा सुरू असताना जिल्हा प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांनी काही परीक्षा केंद्रांना प्रत्यक्ष भेटी देत येथील कामकाजाची पाहणी केली.न्यू इंग्लिश हायस्कूल वर्धा, न्यू इंग्लिश ज्युनिअर कॉलेज वर्धा, केसरीमल कन्या शाळा वर्धा, अग्रगामी हायस्कूल आर्वी रोड वर्धा, न्यू आर्ट्स, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज, बॅचलर रोड वर्धा, श्रीकृष्णदास जाजू ग्रामीण सेवा महाविद्यालय पिंपरी मेघे, जानकीदेवी बजाज विज्ञान महाविद्यालय वर्धा, बापूराव देशमुख कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग सेवाग्राम, भरत ज्ञानमंदिरम् अँड ज्युनिअर कॉलेज वर्धा या केंद्रांवरून रविवारी सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत २ हजार ८१४ परीक्षार्थ्यांपैकी एकूण २ हजार २६३ परीक्षार्थ्यांनी गट ‘क’ सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दिली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे आयोजित महाराष्ट्र गट ‘क’ सेवा संयुक्त पूर्व परीक्षा कॉपीमुक्त व्हावी या हेतूने भरारी पथक सज्ज करण्यात आले होते. भरारी पथकातील अधिकाऱ्यांनीही परीक्षा केंद्रांवर भेटी दिल्यात.
एका बाकावर एकच परीक्षार्थी- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे आयोजित महाराष्ट्र गट ‘क’ सेवा संयुक्त पूर्व परीक्षेला कॉपीमुक्त आणि शांततेत पार पडावी, या हेतूने नऊही केंद्रांवरील प्रत्येक परीक्षा खोलीतील एका बाकावर एकच परीक्षार्थ्याला बसविण्यात आले होते. इतकेच नव्हे तर कोविडसंदर्भातील खबरदारीच्या नियमांचे पालन परीक्षार्थ्यांकडून करून घेण्यात आले.
साहित्य ठेवावे लागले परीक्षा खोलीबाहेरच- परीक्षा कालावधीत १४४ कलम लागू करण्यात आले होते. इतकेच नव्हे तर प्रत्येक परीक्षार्थ्याला त्याची बॅग तसेच मोबाइल व इतर साहित्य परीक्षा खोलीबाहेरच ठेवण्यास लावल्यावरच परीक्षा खोलीत प्रवेश देण्यात आला.