पुलगाव : जिल्ह्यात सर्वात मोठी व राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणारी नाचणगाव ग्रामपंचायत सध्या ग्रामस्थांना जीवनाश्यक सुविधा पुरविण्यास असमर्थ ठरत आहे. पाणी, रस्ते, आरोग्य व प्रकाश व्यवस्थेकडे ग्रा.पं. प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. ग्रा.पं. हद्दीतील अनेक भागांत विद्युत खांबावरील पथदिवे बंद आहेत. यामुळे गत दोन महिन्यांपासून प्रशासनाचा अंधार दिसून येतो.वास्तविक, ग्रामीण भागातील प्रशासन म्हणजे ग्रामपंचायत होय. ग्रामस्थांना सार्वजनिक आरोग्य, प्रकाश व्यवस्था, दळणवळणासाठी रस्ते, पाणी पुरवठा आदी दैनंदिन जीवनाशी निगडीत सुविधा पुरविण्याची जबाबदारी ही ग्रामपंचायतीची असते. यासाठी ग्रा.पं. प्रशासनाद्वारे पाणी पट्टी, मालमत्ता, शिक्षण व आरोग्य आदी कराची वसुली ग्रामस्थांकडून केली जाते. यात लाखो रुपयांचा महसूल वसूल केला जातो; पण सुविधा पुरविण्याकडे लक्ष दिले जात नाही. या ग्रा.पं. क्षेत्रात शहरालगतच्या अनेक मोठ-मोठ्या वसाहती आहेत. अनेक भूखंडांचे वसाहतीत रूपांतर झाले आहे. या वसाहतींमधून ग्रा.पं. प्रशासन लाखो रुपयांचा महसूल सक्तीने वसूल करीत असते. इतकेच नव्हे तर ग्रा.पं. च्या उत्पन्नात या परिसराचा मोठा वाटा असतो; पण अनेक भागांत पक्क्या नाल्या, रस्ते नाहीत. पुरेसा पाणी पुरवठा नाही, सार्वजनिक आरोग्याचा अभाव आहे. या भागातील नागरिक समस्या घेऊन प्रशासनाकडे जातात; पण त्यांना समाधानकारक उत्तरे दिली जात नसल्याची ओरड ग्रामस्थांतून होत आहे. सदस्यांसह ग्रा.पं. प्रशासनाचे नागरिकांच्या या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.(तालुका प्रतिनिधी)
ग्रामपंचायत हद्दीतील वसाहतीत अंधार
By admin | Updated: July 22, 2015 02:46 IST